प्रतिनिधी / दोडामार्ग:
तालुक्यातील सासोली (वाघमळा) येथील करण संजय भुजबळ या 23 वर्षीय युवकाने गळफास घेत रविवारी दुपारी आत्महत्या केली. याबाबत दोडामार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे. नातेवाईकांच्या माहितीनुसार नोकरीतील अस्थैर्यामुळे आत्महत्येचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. चार दिवसांपूर्वी कोनाळकट्टा येथील युवकाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना ताजी असताना या दुसऱया घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबतची नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, करण याचे शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण गोव्यात झाले. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तो अलिकडेच दीड वर्षापूर्वी पुणे येथे एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करायचा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यावर विविध आस्थापना बंद करण्यात आली. त्यामुळे तो गावी आला होता. त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे त्याचा गावात बराच मित्रपरिवार आहे. सुट्टीत त्याने मित्रांशी बोलताना आपले मानसिक दडपण कोणाला दाखवून दिले नाही. रविवारी सकाळीही त्याने मित्रांशी स्मितहास्य केले. मात्र, दुपारी आई-वडील शेतीच्या कामाला गेल्याची संधी साधत करणने राहत्या घरात गळफास घेतला. त्याला उपचारासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण, डॉक्टरांनी मृत घोषित केले. पश्चात आई-वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे. दोडामार्ग येथील पशुवैद्यकीय विभागातील कर्मचारी प्रेमानंद सावंत यांचा तो भाचा होय. या आत्महत्याप्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात नोंद असून फिर्याद घेण्याचे प्रक्रिया सुरू केली होती.









