सावर्डे भाजप मंडळाने पंच, उपसरपंच, सरपंचांसह घेतलेल्या पत्रकार परिषदेत दावा : मंत्री दीपक पाऊसकर यांनी विकासकामांना चालना दिली
प्रतिनिधी /कुडचडे
सावर्डे मतदारसंघातील काही भाजप कार्यकर्ते ज्या प्रकारे सावर्डे मतदारसंघात विकास न झाल्याचे सांगत आहेत त्यांनी ते प्रत्यक्षात येऊन पाहावे. कारण जेव्हा आमदार दीपक पाऊसकर निवडून आले तेव्हापासून सावर्डे मतदारसंघात विकासकामांना चालना मिळत आली आहे, असे आजी-माजी पंच, उपसरपंच, सरपंच यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
भाजप कार्यकर्ते, जे सावर्डे मतदारसंघातले आजी-माजी पंच, सरपंच आहेत, त्यांनी बैठक घेऊन मतदारसंघात विकास होत नसल्यामुळे आमदार पाऊसकर यांना यंदा उमेदवारी देऊ नये असे पक्षाच्या कोअर कमिटीला कळविण्याचा निर्णय घेतल्याची बातमी ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यांदर्भात सावर्डे भाजप मंडळ अध्यक्ष व सदस्य तसेच सातही पंचायतींतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सावर्डे येथील गिरीश भवनमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. उपस्थित पंच, उपसरपंच व काही सरपंचांनी माहिती दिल्यानंतर सावर्डे भाजप मंडळ अध्यक्ष विलास देसाई यांनी सांगितले की, आज जी एकता भाजप कार्यकर्त्यांत दिसून आली आहे ती चांगली गोष्ट आहे. सावर्डे मतदारसंघात सात पंचायती आहेत. त्यातील पंच असो वा सरपंच, जर एखादे काम त्यांनी आमदारांसमोर मांडले, तर ते व्यवस्थित पूर्ण करण्याचे काम आमदारांचेच आहे. आज ज्या प्रकारे सर्वांनी आपापल्या भागात जो विकास झाला आहे त्याची माहिती दिली त्याबद्दल मंडळ अध्यक्ष या नात्याने त्यांचा आपण आभारी आहे, असे ते म्हणाले.
विकासावर विश्वास ठेवा
निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे विरोधक टीका करणारच. पण ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने विकास केला आहे त्यावर विश्वास ठेऊन सर्वांनी कार्य करत राहावे. त्या विश्वासाला फळ हे मिळणारच. कारण भाजपने सावर्डे मतदारसंघाला कायम मान दिलेला आहे. त्यात विनय तेंडुलकर यांना राज्यसभा खासदाराचा मान दिला. जिल्हा पंचायत सदस्यांना जिल्हा पंचायत अध्यक्षपद दिलेले आहे. तसेच आमदार पाऊसकर याना राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते दिलेले आहे. यापुढेही भाजप सावर्डे मतदारसंघाच्या मतदारांना हवा असलेलाच आमदार देणार. त्यामुळे कार्यकर्त्यांनी उमेदवारीबद्दल चिंता न करता पक्ष देणार असलेल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी पक्ष मजबूत करण्यावर भर द्यावा, असे आवाहन देसाई यांनी यावेळी केले.
विरोधामागे गैरसमज असू शकतो
आज ज्या प्रकारे भाजप कार्यकर्तेच भाजपचे विरोधक झाले आहेत त्यासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना देसाई म्हणाले की, ज्या प्रकारे कार्यकर्त्यांकडून विरोध दर्शविण्यात येत आहे तो पाहता त्यामागे त्यांचा गैरसमज असू शकतो. कारण येथे सविस्तर माहिती संबंधित पंचांनी दिली आहे. सावर्डे मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते एकत्र आहेत व ज्यावेळी उमेदवारी निश्चित होईल त्यावेळी हा गैरसमज दूर होण्यास वेळ लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.
सावर्डेत भाजपच राज्य करेल
सावर्डे मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. इतर मतदारसंघांत जसे विविध पक्ष दिसून येतात तसे सावर्डेत नसून जास्तीत जास्त भाजपचे व काही प्रमाणात मगोचे समर्थक आहेत. सावर्डे मतदारसंघात यापुढेही भाजपच राज्य करेल. जे कोणी आरोप करतात त्यावर आपण कारवाई करू शकत नाही. कारण लोकशाहीत बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, असे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना देसाई यांनी सांगितले. मतदारसंघाचा विकास होत नसल्यामुळे आमदार पाऊसकर यांनी भाजपात प्रवेश केला. तेव्हापासून बऱयाच प्रमाणात मतदारसंघात चांगले रस्ते व इतर कामे झालेली आहेत. आमदारांनी जाहीरनाम्यातील काही प्रमाणात कामे केलेली आहेत व पुढील पाच वर्षांत राहिलेली कामे पूर्ण करण्यात येतील, असे म्हणत देसाई यांनी पुढे जास्त बोलणे टाळले.
दोन गट हा गैरसमज
सावर्डे मतदारसंघात भाजपात दोन गट निर्माण झाले आहेत हा मोठा गैरसमज असून मतदारसंघातले सर्व कार्यकर्ते एकत्र आहेत व पक्ष मतदारसंघाला जो उमेदवार देईल त्याला आम्ही सर्व निवडून आणणार, असे त्यांनी सांगितले. मंडळाच्या सहसचिवांनी नुकतीच प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले होते की, सचिवांना विश्वासात न घेता कामे केली जातात. यासंबंधीच्या प्रश्नावर मंडळ अध्यक्ष ठोस असे उत्तर देऊ शकले नाहीत.
वाघोण किर्लपाल दाभाळ पंचायतीचे पंच तुळशीदास गावकर यांनी सांगितले की, यावेळेस पाऊसकर कोणत्याही स्थितीत आमदार होणारच व त्यांना परत एकदा बांधकाम खाते मिळणार यात कोणतीच शंका नाही. कारण ज्यावेळेस आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितले की, दीपक पाऊसकर ही एक चांगली व्यक्ती आहे व यावेळी उमेदवारी त्यांनाच देणार. उमेदवारीबाबत काही गडबड झाली, तर आपण मुख्यमंत्र्यांना बघून घेईन, असे ते म्हणाले.
ढवळीकरांनी सावर्डेसाठी काहीच केले नाही
आमदार पाऊसकर मगो पक्षातर्फे निवडणुकीत उतरले होते तेव्हा त्यांनी जो जाहीरनामा लोकांसमोर ठेवला होता त्यासंबंधी देसाई यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ज्या वेळेस मगोतर्फे पाऊसकर निवडून आले त्याच्या अगोदर मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी सावर्डे मतदारसंघातील सर्व त्रुटी दूर करेन, असे सांगितले होते. पण ढवळीकर यांनी अडीच वर्षे सावर्डे मतदारसंघासाठी काहीच केले नाही व मतदारसंघाचा विकास झाला नाही. सुदिन ढवळीकर यांनी भाजपशी युती झाल्यावर सावर्डे मतदारसंघाचा विचार करायला पाहिजे होता. पण त्यांनी त्यात लक्ष घातले नाही. ही त्यांची मोठी चूक आहे, असे ते म्हणाले. जिल्हा पंचायत अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर यांनी स्वागत केले. उपस्थित पंच, उपसरपंच, सरपंचांनी विकासकामे झाल्याची ग्वाही देत भाजपाची उमेदवारी दीपक पाऊसकर यांनाच द्यावी अशी मागणी केली. दीड तासाच्या पत्रकार परिषदेत मंडळ अध्यक्ष फक्त 22 मिनिटे बोलले आणि तेही व्यवस्थित उत्तरे न देऊ शकल्याने तेथेच पूर्णविराम घेण्यात आला.









