ऑनलाईन टीम / पुणे :
हे मातृभूमी तुजसाठी मरण ते जनन…तुजवीण जनन ते मरण या विनायक दामोदर सावरकर यांच्या काव्यपंक्ती गात आणि होय मी सावरकर अशा घोषणा देत चिमुकल्यांनी जनसामान्यांचा दाता आणि चैतन्याचा दाता असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन केले. सावरकरांच्या वेशातील मुलांनी यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माहिती सांगत त्यांचे काव्य देखील सादर केले.
साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने कर्वे रस्त्यावरील वीर सावरकर स्मारक येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त होय मी सावरकर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावरकर यांच्या वेशभुषेतील मुलांनी त्यांचे विचार आणि कविता सादर केल्या. यावेळी इतिहास संशोधक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभ्यासक प्रा.सु.ह. जोशी, मंडळाचे अध्यक्ष पीयुष शाह, आश्विनी देशपांडे, वृषाली साठे, राधिका बविकर, प्रतिभा पवार, सारिका पाटणकर, विकास महामुनी, किरण सोनिवाल, नंदू ओव्हाळ, कल्पना ओव्हाळ उपस्थित होते.
यावेळी सु.ह. जोशी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेप याविषयीची माहिती मुलांना गोष्टीरुपात दिली. सु.ह.जोशी म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी २ वेळा म्हणजे ५० वर्षे जन्मठेपेची शिक्षा भोगली. आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर त्यांनी याकाळात महाकाव्य लिहीले. सावरकर प्रत्येक घरी पोहोचले पाहिजेत. गरिब, श्रीमंत अशा प्रत्येक घरी सावरकरांचे विचार पोहोचले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करुन मोठे व्हा आणि भारत देशाला देखील मोठे करा, असेही त्यांनी सांगितले.
पीयुष शाह म्हणाले, विद्यार्थ्यांना विनायक दामोदर सावरकर यांचे विचार कळावेत आणि आजच्या दिवसाचे महत्त्व कळावे यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्या ठिकाणी सावरकरांनी विदेशी कपड्यांची होळी केली होती त्याच ठिकाणी स्वदेशीचे महत्त्व सांगून मुलांना सावरकरांच्या स्वातंत्र्यलढ्याची माहिती देण्यात आली.








