सावंतवाडी/प्रतिनिधी-
सावंतवाडी शहर तसेच तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत अनेक संघटनांनी पोलिसांना निवेदन देऊन सतर्क पण केलं आहे परंतु पोलिस अशा तपास कामांमध्ये दखल घेत नसल्याचे जाणवत आहे. पोलीस कशात गुंतले आहेत याचा जनतेला शोध घ्यावा लागेल. माऊली मंदिरात झालेली चोरी ही पोलिसांचं अपयश आहे.
चोऱ्यांचे सत्र सध्या तळकोकणात सुरू असून इथल्या वरिष्ठ लोकप्रतिनिधींना याबाबतचे सोयरसुतक नाही. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक गेडम यांनी स्वतः या प्रकरणी लक्ष घालावं. अन्यथा सावंतवाडी पोलीस स्टेशनवर नागरिकांचा मोर्चा आणावा लागेल आणि त्याची पूर्ण जबाबदारी सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची राहील असा गंभीर इशारा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला आहे.









