शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा आरोप : नगराध्यक्ष परब यांच्यावर टीका
वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी शहरात गेल्या चार महिन्यांपासून अशांतता निर्माण झाली आहे. व्यापारी वर्गात फूट तसेच पालिका महिला अधिकारी कर्मचाऱयांना दमदाटी अशा प्रकारांमुळे सुसंस्कृत, शांत शहराला हे शोभनीय नाही. नगराध्यक्ष संजू परब यांनी यावर आत्मपरीक्षण करावे. पालिकेत दिवसरात्र नगरसेवक, अधिकारी यांच्या व्यतिरिक्त रिकामटेकडे टोळके घिरटय़ा घालत असतात. पालिका अशा व्यक्तींचा अड्डा बनल्याचा गंभीर आरोप शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, शहरप्रमुख तथा नगरसेवक बाबू कुडतरकर, उपजिल्हाप्रमुख शब्बीर मणियार, परब, अमेय प्रभूतेंडोलकर आदींनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला. शहरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची संकल्पना स्तुत्य आहे. शिवसेना या उपक्रमाला सहकार्य करेल पण परब यांनी सावंतवाडी संस्थानकालीन नगरीची संस्कृती जोपासायला हवी. छत्रपतींचा वारसा अंगी जोपासणे आवश्यक आहे, असे राऊळ म्हणाले.
सावंतवाडी येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात राऊळ यांनी पत्रकार परिषद घेतली. नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. सावंतवाडी शहराचे आतापर्यंत जे नगराध्यक्ष झाले, दीपक केसरकर, बबन साळगावकर आदींनी शांतता, स्वच्छता, संस्कृती जोपासली पण गेल्या चार महिन्यात परिवर्तन घडले अन् शहरात व्यापारी वर्गात फूट, पालिका अधिकारी-कर्मचारी यांच्यात तेढ तसेच समाजात अशांतता निर्माण झाली आहे. परब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची संकल्पना चांगली आहे. परंतु परब यांनी शहरात काय घडतेय बिघडतेय याकडे लक्ष द्यायला हवे.
पालिका रिकामटेकडय़ांचा अड्डा
पालिकेत सायंकाळी पाचनंतर नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व्यतिरिक्त रिकामटेकडे वावरताना दिसताच. पालिका रिकामटेकडय़ांचा अड्डाच बनली आहे. नगराध्यक्षांच्या अवतीभोवती हे फिरतात. त्यामुळे परब यांनी आत्मचिंतन करावे, असे राऊळ म्हणाले.
बाबू कुडतरकर म्हणाले, शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायला हवा. नगराध्यक्ष साळगावकर असताना त्यांची संकल्पना होती. मोती तलाव परिसरात आठ ठिकाणी तलावाकाठी छत्रपती शिवाजी महाराज व अन्य महान व्यक्तींचे स्टॅच्यू उभारण्याचे. त्यासाठी आर्किटेक्ट आणून आराखडा तयार करण्यात आला होता. स्थायी समिती बैठकीत आता पुतळय़ांबाबत फक्त चर्चा झाली, असे ते म्हणाले.









