मनपाकडून कारवाईस प्रारंभ :
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक अंतर राखणे, तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई घालण्यात आली आहे. या नियमावलीचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी बजावला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱया व्यक्तीकडून 500 रुपये दंड वसूल करण्याची कारवाई मनपाने सुरू केली आहे.
कोरोना विषाणूंचा प्रसार होऊ नये या दृष्टीने प्रशासन आणि आरोग्य खाते प्रयत्नशील आहे. विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाने विविध सूचना केल्या आहेत. त्यांचे पालन व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. शहरात विनाकारण फिरू नये, घरातून बाहेर पडल्यास मास्क लावणे आवश्यक आहे. सामाजिक अंतर ठेवण्याची अट घालण्यात आली आहे. तोंड, नाक, कान व हाताद्वारे या विषाणूंची लागण होण्याची शक्मयता आहे. हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक स्थळी थुंकण्यास बंदी घालण्यात आली आले. मात्र, नागरिकांकडून या नियमावली पायदळी तुडवल्या जात आहेत. पान-तंबाखू खाऊन थुंकणे, तोंडाला मास्क न लावणे असे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा नागरिकांवर कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी मनपाच्या आरोग्य अधिकाऱयांसह स्वच्छता निरीक्षक, महसूल निरीक्षक, वॉर्ड क्लार्क आदींना दिला आहे. त्यामुळे याच्या अंमलबजावणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विनामास्क फिरताना आढळल्यास 100 रुपये दंड आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 500 रुपये दंड आकारण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात फिरणाऱया नागरिकांवर कारवाई करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.









