पॅरिस / वृत्तसंस्था
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने अमेरिकेच्या आयरिस वँग हिच्याविरुद्ध रोमांचक विजय प्राप्त करत अर्लिन्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत उपांत्य फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत सध्या 20 व्या स्थानी असलेल्या सायनासाठी मागील दोन वर्षातील ही पहिलीच उपांत्य लढत असेल. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरण्याच्या दृष्टीने गुण मिळवण्यासाठी देखील ही स्पर्धा सायना नेहवालसाठी विशेष महत्त्वाची आहे.
यापूर्वी जानेवारी 2019 मध्ये सायनाने इंडोनेशिया मास्टर्स 500 स्पर्धेत आपली शेवटची उपांत्य लढत खेळली. ती स्पर्धा देखील सायनानेच जिंकली होती. भारतातर्फे चौथे मानांकन लाभलेल्या सायनाने यापूर्वी मागील आठवडय़ात ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमधून दुखापतीमुळे माघार घेतली होती. येथे उपांत्यपूर्व फेरीत तिने अमेरिकेच्या वँगला 21-19, 17-21, 21-19 अशा फरकाने मात दिली.
आता उपांत्य फेरीत सायनाची लढत डेन्मार्कची लिने ख्रिस्तोफेर्सन किंवा राष्ट्रीय सहकारी इरा शर्मा यांच्यापैकी एका प्रतिस्पर्धीविरुद्ध होऊ शकेल. राष्ट्रकुल कांस्यजेते अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी यांनी महिला दुहेरीत शेवटच्या चारमध्ये स्थान संपादन केले. या जोडीने उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडच्या तिसऱया मानांकित बिर्च व लॉरेन स्मिथ यांचा 21-14, 21-18 अशा सरळ फरकाने पराभव केला. आता उपांत्य फेरीत या जोडीची लढत थायलंडच्या जोंगकोल्फॅन व प्राजोंगजई यांच्याविरुद्ध होईल.
पुरुष दुहेरीत कृष्ण प्रसाद गरगा व विष्णू वर्धन गौड पंजाला यांनी फ्रान्सच्या ख्रिस्तोव्हो पोपोव्ह व तोमा ज्युनियर पोपोव्ह यांचा 21-1710-21, 22-20 असा पराभव केला. ही लढत 1 तास 3 मिनिटे चालली.









