वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथील इंदिरा गांधी स्टेडियमच्या संकुलामध्ये भारतीय सायकलस्वारांसाठी सायकलींग राष्ट्रीय सराव शिबिराला प्रारंभ झाला आहे. हे सायकलींग सराव शिबीर स्प्रिंट गटासाठी राहील.
या शिबिरात दाखल होण्यासाठी गेल्या आठवडय़ापासून विविध राज्यांतील सायकलस्वार दिल्लीत दाखल झाले असून त्यांना एक आठवडय़ाच्या कालावधीसाठी क्वॉरंटाईनमध्ये राहावे लागले. भारतीय सायकलपटूंसाठी हे राष्ट्रीय सराव शिबीर सुरूवातीला मणिपूरमध्ये घेण्याची योजना आखण्यात आली होती पण पतियाळातील एनआयएसने या शिबिराला विरोध दर्शविला. त्यानंतर हे शिबीर दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमच्या राष्ट्रीय सायकलींग अकादमीमध्ये घेण्याचा निर्णय भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाने (साई) घेतला. दरम्यान राष्ट्रीय सायकलींग सराव शिबीर पतियाळामध्ये घेण्यास अखिल भारतीय सायकलींग फेडरेशनने विरोध केला होता. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये सुरू झालेल्या राष्ट्रीय सायकलींग सराव शिबिरात मणिपूरचे पाच, पंजाबचे तीन, अंदमान आणि निकोबारचे दोन तसेच पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र येथील प्रत्येकी एक सायकलपटू सहभागी झाला आहे. या सराव शिबिरासाठी सायकलपटूंकरिता साईतर्फे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.









