वृत्तसंस्था/ गुवाहाटी
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसऱया पर्वात बुधवारी महाराष्ट्राच्या सायकलपटूंनी आपला दबदबा कायम राखला. कोल्हापूरच्या पूजा दानोळे हिने सुवर्णपदकाचा चौकार लगावताना वैयक्तिक परस्यूट स्पर्धा जिंकली. साताऱयाच्या मयूर पवार याने स्प्रींट प्रकारात बाजी मारताना दुसरे सुवर्णपदक जिंकले. मयुरी लुटे हिला सपिंट प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
लक्ष्मीबाई राष्ट्रीय शाररीरिक शिक्षण संस्थेच्या वेलोड्रमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत आज कोल्हापूरच्या पूजाचीच चर्चा राहिली. तिने वैयक्तिक चौथे सुवर्णपदक जिंकताना आज 200 मीटर परस्यूट शर्यतीत 2 मिनीट 47.41 सेकंद वेळ दिली. या वेळी तिचा वेग ताशी 43.01 प्रति कि.मी. इतका होता. स्पर्धेत पूजाने एकूण चार सुवर्ण आणि एक कांस्य अशी पाच पदके जिंकली. तिने बिसेशोरी चानू या मणिपूरच्या स्पर्धकास (2 मिनीट 57.29 सेकंद) असे सहज मागे टाकले. कर्नाटकची अंकिता राठोड (2 मिनीट 54.83 सेकंद) कांस्यपदकाची मानकरी ठरली.
साताऱयाच्या मयूर पवारला सुवर्ण
मुलांच्या 21 वर्षांखालील स्प्रींट प्रकारात साताऱयाच्या मयूर पवार याने आपले आशियाई विजेतेपद सार्थकी लावले. आपल्याला स्पर्धक नाही हेच दाखवत त्याने स्प्रींट प्रकारात वर्चस्व राखले. स्पर्धेतील 200 मीटर अंतराच्या शर्यतीत त्याने तब्बल 63 कि.मी. प्रतिवेग राखताना अंदमानच्या पॉल कॉलिंगवूडला सहज मागे टाकले. मयूरने 11.306 सेकंद अशी वेळ दिली, तर पॉलला 11.576 सेकंद अशी वेळ देता आली. पंजाबच्या गुरप्रीतला, स्पर्धकाला अडचणीत आणल्याने अपात्र ठरविण्यात आल्याने केरळचा ए. अभिंदू (11.575 सेकंद) कांस्यपदकाचा मानकरी ठरला.
मुलींच्या 21 वर्षांखालील गटातच 200 मीटर स्प्रींट प्रकारात महाराष्ट्राच्या मयुरी लुटे हिचे प्रयत्न अपयशी ठरले. आंतरराष्ट्रीय सायकलपटू पश्चिम बंगालच्या त्रियाशा पॉल हिने ही शर्यत सहज जिंकली. तिच्या वेगाचा सामना करताना मयुरी काहीशी दडपणाखाली दिसून आली. त्रियाशाने 12.362 सेकंद, तर रौप्यपदक जिंकत मयुरीने 12.558 सेकंद अशी वेळ दिली. केरळाची अलिना रेजी (12.647 सेकंद) कांस्यपदकाची मानकरी ठरली.
महाराष्ट्राच्या सायकलपटूंनी घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळाले. त्यांनी खरेच खूप चांगली कामगिरी केली. त्यांचे कौतुक करायलयाच हवे. आता उद्या अखेरच्या दिवशी देखील आपले सायकलपटू पदके मिळवतील, असा विश्वास महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षिका दिपाली पाटील यांनी व्यक्त केला.