सांगली : प्रतिनिधी
राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर “सामाजिक समता कार्यक्रम” दि. 6 ते 14 एप्रिल 2022 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत सामाजिक समता सप्ताह निमित्त जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात दि. 12 व 13 एप्रिल रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 पर्यंत विविध महाविद्यालयात तालुकास्तरीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य यांनी दिली.
जात प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहिमेंतर्गत पुढील महाविद्यालयांमध्ये शिबीराचे आयोजन केले आहे. दि. 12 एप्रिल रोजी पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय, तासगांव, मातोश्री बयाबाई कन्या महाविद्यालय, कडेगांव, श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी, रामराजे ज्यु कॉलेज जत, राजारामबापू इन्सिटीटयुट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर या महाविद्यालयात तर दि. 13 एप्रिल रोजी बळवंत कॉलेज विटा, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगलवाडी ता. मिरज व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड, सांगली, आर्टस सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेज रामानंदनगर, ता. पलूस व पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय, कवठेमहंकाळ या महाविद्यालयात शिबीराचे आयोजन केले आहे.
दि. 11 वी, 12 वी विज्ञान शाखेत शिकत असलेले विद्यार्थी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यात इच्छुक असलेले विद्यार्थी, प्राधान्याने विज्ञान शाखेतील विद्यार्थी/सीईटी देणारे/डिप्लोमा तृतीय वर्षात शिकत असलेले विद्यार्थी यांनी वर नमुद केलेल्या तारखेस जात प्रमाणपत्र पडताळणीचा परिपूर्ण ऑनलाईन अर्ज व पुराव्याच्या प्रमाणित प्रती व पुराव्याच्या मुळ प्रतीसह आपल्या तालुक्यातील महाविद्यालयात उपस्थित रहावे. या शिबिरात सकाळी 11 ते 12 या वेळेत मार्गदर्शनपर शिबीर व दुपारी 12 ते सायं 5 पर्यंत विद्यार्थ्यांचे परिपूर्ण प्रकरण स्विकारण्यासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. तरी विद्यार्थ्यांनी आपल्या तालुक्यातील शिबीराचे आयोजन केलेल्या महाविद्यालयात उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व जाती प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव समक्ष उपस्थित राहून जमा करावा, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगली यांच्यावतीने करण्यात आले आहे.









