10 हजार रुपये दंड वसूल : विनामास्क वाहनधारकांनाही दंड
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना विषाणूंचा प्रसार वाढत चालल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नियमांचे काटेकोर पालन करण्याचा आदेश आरोग्य खात्याकडून करण्यात आला आहे. मात्र, सामाजिक अंतर राखण्याकडे आणि मास्क परिधान करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. डी-मार्टमध्ये सामाजिक अंतर राखले नसल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेने कारवाईची नोटीस बजावली असून, 10 हजार रुपये दंड भरण्याची सूचना केली आहे.
सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विनामास्क फिरणाऱया नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत महापालिकेच्या अधिकाऱयांनी केवळ वाहनधारकांनाच लक्ष्य करून विनामास्क कारवाईद्वारे दंड वसूल करण्याचा सपाटा चालविला होता. पण आता मॉल तसेच बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱया नागरिकांवर कारवाई करण्याचे सत्र राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या अधिकाऱयांनी विविध मॉलना भेटी देऊन पाहणी केली असता डी-मार्टमध्ये सामाजिक अंतर राखण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले. कोरोना नियमावलीचे पालन करण्यात येत नसल्याचे आढळून आल्याने डी-मार्टच्या व्यवस्थापन मंडळाकडे याचा जाब विचारण्यात आला. शहरात तसेच देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मास्क वापरण्याकडे आणि सामाजिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष का, अशी विचारणा करण्यात आली. नियमावलीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने मनपाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी डी-मार्टला नोटीस बजावली आहे. तसेच 10 हजार रुपये दंड भरण्याची सूचना करण्यात आली आहे.
दुचाकी वाहनचालकांना अडवून विनामास्क प्रकरणी दंड वसूल करण्यात येत होता. मात्र, बाजारपेठ तसेच अन्य ठिकाणी विनामास्क फिरणाऱया नागरिकांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. याबाबत वृत्तपत्रांतून टीका होताच महानगरपालिकेने बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱया नागरिकांवरदेखील कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. सामाजिक अंतर राखण्यात येत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर महानगरपालिकेने पहिल्यांदाच ही कारवाई करून दंड भरण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र, डी-मार्ट व्यवस्थापन मंडळाने दंड भरण्यास टाळाटाळ चालविली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. विनामास्क आणि सामाजिक अंतर राखण्यात येत नसल्याने महापालिकेने आता कडक धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखाहून अधिक झाल्याने यापुढे कोरोना नियमावलीची अंमलबजावणी काटेकोरपणे राबविण्यात येत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱयांनी सांगितले.









