वृत्तसंस्था/ लंडन
जागतिक टेनिसमधील फेडरेशन कप स्पर्धेत दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी देण्यात येणाऱया ‘फेड कप हार्ट अवॉर्ड’ साठी भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाला नामांकन देण्यात आले आहे. फेडरेशन कप ही महिला टेनिसची दरवर्षी होणारी सांघिक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. यात विभागीय गटातून सानियासह एकूण सहा टेनिसपटूंना नामांकन देण्यात आले आहे. विजेत्यांची नावे 11 मे रोजी घोषित करण्यात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली.
युरोप-आफ्रिकासाठी इस्टोनियाची ऍनेट कोंटावीट व लक्झेमबर्गची मोलिनारो, अमेरिकन विभागासाठी मेक्सिकोची फर्नांडा गोमेझ व पेराग्वेची व्हेरोनिका आणि आशिया-ओशेनिया गटातून सानियासह इंडोनेशियाची प्रिस्का नुग्रोहो यांना मानांकन देण्यात आले आहे. तसेच फेडरेशन कप पात्रता स्पर्धेतील चांगल्या कामगिरीआधारे ऍलेक्झांड्रा सॅस्नोवीच, कार्ला सुआरेझ नवारो व ऍनास्तेशिया सेवास्टोव्हा यांनासुध्दा नामांकन करण्यात आले आहे. या दिग्गज 10 महिला टेनिसपटूंमधून ‘हार्ट अवॉर्ड’ विजेतीची निवड ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. यासाठी 8 मे पर्यंत चाहत्यांना ऑनलाईन मतदान करता येणार आहे.
सानिया 2016 नंतर प्रथमच या स्पर्धेत खेळली होती. तिने मार्चमध्ये भारताला सलग चार लढती जिंकून देताना दुहेरीतील आपले सर्व सामने जिंकले होते आणि या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघ प्रथमच प्ले ऑफसाठी पात्र ठरला आहे.









