प्रतिनिधी / सातारा :
‘पेट्रोल-डिझेल के दाम कम हुए की नही हुए, घरेलू गॅस के दाम कम हुए की नही हुए, अच्छे दिन आए की नही आए’, अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातारा जिल्हा युवा सेनेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अमित शाह यांचे थाळी वाजवून आभार मानले. युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी रणजितसिंह भोसले म्हणाले, पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, डाळी अशा सर्वच गोष्टींचे दर दररोज वाढत आहेत. सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. इंधन दरवाढ करून महागाई वाढवून सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणाऱ्या या जुमलेबाज केंद्रातील नरेंद्र मोदी व अमित शाह सरकारचे सातारा जिल्हाअधिकारी कार्यालयाच्या बाहेर थाळी वाजवून युवा सेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी उपजिल्हा प्रमुख सचिन मोहिते, शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, उपजिल्हा प्रमुख युवा सेना नवनाथ पाटील, फलटणचे माऊली पिसाळ, निवास महाडिक, तुषार घोरपडे आदी उपस्थित होते.









