सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्यात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने सातारकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालिका प्रशासनाकडून यावर ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. तीन दिवसांपूर्वीच राजवाडा परिसरात कुत्र्यांवर विषप्रयोग झाला होता. या घटनेत 7 ते 8 कुत्र्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच शनिवारी सकाळपासून शहरात दोन ठिकाणी भटक्या कुत्र्यांना विषबाधा झाल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत. त्यामध्ये रविवार पेठेत दोन कुत्र्यांचा आणि जुना मोटर स्टॅण्ड परिसरात तीन पिल्लांचा मृत्यू झाला असून, एका कुत्र्यास वाचवण्यात व्हीकेअर संस्थेला यश आले आहे.
साताऱ्यात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे सातारकरांना दिवसा किंवा रात्रीही बाहेर पडताना भिती वाटते. सातारा पालिकेच्यावतीने केवळ भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तांसाठी निधीची तरतूद करण्यात आल्याचे सांगण्यात येते. वास्तविक आरोग्य विभागाकडून अद्याप काहीच हालचाली झाली नसल्याचे समजते. असे असतानाच शनिवारी सकाळीच रविवार पेठ आणि जुना मोटर स्टॅड परिसरात पुन्हा कुत्र्यांना विषबाधा झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. रविवार पेठेतील फुटबॉल मैदानाच्या परिसरात तीन कुत्री पडल्याचे दिसताच नगरसेवक सुनील काळेकर यांनी व्ही केअर संस्थेला फोन करुन सांगितले. व्ही केअर संस्थेच्या जास्मीन अफगाण, सागर सावंत, डॉ. यश सुर्वे तेथे पोहचले. त्यांनी दोन कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले तर एका कुत्र्यावर उपचार केले. तसेच जुना मोटर स्टॅण्ड परिसरात विषबाधा झालेल्या कुत्र्यांच्या पिलांवरही उपचार केले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.