प्रतिनिधी/ सातारा :
ज्यांना परराज्यात जायचे आहे त्यांना मेडिकल सर्टिफिकेट आवश्यक आहे. ते मिळवण्यासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात सुविधा देण्यात आली. मात्र, बुधवारी रुग्णालय परिसरात झालेल्या गर्दीनंतर प्रशासनाने तातडीने अशा प्रकारचे सर्टिफिकेट देण्याचे ठिकाण तातडीने बदलले. रुग्णालय परिसरात सोशल डिस्टन्सचा प्रश्न निर्माण झाला गुरुवारी छत्रपती शिवाजी कॉलेजवर सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तिथेही सकाळपासून भली मोठी रांगच्या रांग कर्मचाऱयांनी लावली होती. सर्टिफिकेट घेण्यासाठी परप्रांतियांची झुंबडच उडाली असून यामुळे प्रशासनाची धावपळ होत असून या बाबीकडे मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे समोर आले. दिवसभरात सुमारे 2 ते अडीच सर्टिफिकेटचे वाटप झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.
राज्य शासनाने परराज्यात जाणाऱयाकरता सुविधा उपलब्ध करून देण्याचे घोषित केले आहे. त्यानुसार सातारा जिह्यात जिल्हा प्रशासनाने प्रांतनिहाय नियोजन केले आहे. सातारा शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मेडिकल सर्टिफिकेट मिळवण्यासाठी होत असलेली गर्दी पाहून साताऱयातील परप्रांतीय नागरिकांची संख्या किती मोठी आहे हे समोर आले. त्यांच्या हाताला काम नसल्याने त्याना आपल्या राज्यात जाण्याचे वेध लागले आहेत. बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयाबाहेर भली मोठी रांग लागली होती. रांगेतल्या नागरिकांनी सोशल डिस्टनन्स पाळला गेला नव्हता. तेथे पोलीस कर्मचारी नसल्याने त्या जिल्हा रुग्णालयातील यंत्रणेला कसरत करावी लागत होती.
क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय सातारा येथे बुधवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास अंदाजे 800 ते 1000 नागरिकांनी त्यांच्या स्वतःच्या गावी जाण्यासाठी आवश्यक असणारे वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी केली. या घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, प्रशासकीय अधिकारी डॉ. सुधीर बक्षी, डॉ. रामचंद्र जाधव, डॉ. सुनिल सोनावणे यांच्यासह सुरक्षारक्षक व इतर कर्मचारी यांच्या मदतीने सोशल डिस्टेन्स पाळण्याबाबत व गर्दी कमी करण्याबाबत सर्वांना आवाहन करण्यात आले.
शिवाजी कॉलेज परिसरात झाली गर्दी
गुरुवारपासून ही व्यवस्था शिवाजी कॉलेज सातारा येथे करण्यात आली. तसेच नजीकच्या खाजगी वैद्यकीय व्यवसायीक यांच्याकडून सुध्दा असे वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. त्यामुळे परप्रांतिय कामगारांची कॉलेज परिसरात मोठी गर्दी झाली होती. तिथे रांगा लावून सर्टिफिकेट देण्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरु करण्यात आले होते. सोशल डिस्टन्स पाळून यापुढे सर्व गोष्टी कराव्या लागणार सर्व कामगारांनी गर्दी न करता प्रशासनाने दिलेल्या वेळेत सर्टिफिकेट घेण्यासाठी उपस्थित रहावे.









