प्रतिनिधी / महाबळेश्वर
सुरूर ते पोलादपुर राज्य मार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात करण्यासाठी राज्य शासनाचे केंद्राबरोबर चर्चा सुरू असून ११ ऑक्टोबर रोजी या विषयावर चर्चा करण्यासाठी खास बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहीती उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी अंबेनळी घाटात पत्रकारांशी बोलताना दिली. या वेळी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, आ. मकरंद पाटील व पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड हे उपस्थित होते.
जुलै महीन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर पोलादपुर दरम्यान असलेल्या अंबेनळी घाटाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी घाटरस्ता तुटून दरीत कोसळला होता तर, अनेक ठिकाणी वृक्षांसह घाट रस्त्यावर दरडी कोसळल्या होत्या. या आपत्तीमुळे घाटातील वाहतुक तब्बल दिड महीना बंद होती. तसेच या रस्त्या अभावी या भागातील 22 गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला होता. या घाटाच्या रस्त्याची तातडीने दुरूस्ती व्हावी, या साठी सार्वजनिक बांधकाम खात्यांच्या अधिकारी यांच्या बरोबर आ. मकरंद पाटील यांनी पाहणी करून काम युध्दपातळीवर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. आ. मकरंद पाटील यांच्या सुचने प्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने युध्दपातळीवर काम करून या घाटातील वाहतुक पुर्ववत सुरू केली होती.
डिसेंबरमध्ये नागपुर येथील अधिवेशनात या घाटरस्त्यासाठी जो निधी लागणार आहे. तो मंजुर करण्याचे काम नक्कीच केले जाईल. कोकण आणि घाट या दोन वेगवेगळया प्रदेशांना जोडणारा हा मार्ग आहे. या मार्गां वरून पुर्वी प्रमाणे कशा प्रकारे वाहतुक सुरू होईल या साठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. सुरूर ते पोलादपुर या मार्गावरच महाबळेश्वर हे राज्याचे लाडके पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी दोन्ही बाजुंनी पर्यटकांना येण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होणारा आहे. ज्या भागातील रस्त्यांवर अधिक वर्दळ आहे. त्या रस्त्यांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. महाबळेश्वरकडे येणारे सर्वच रस्त्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. वेळी तहसिलदार सुषमा चौधरी पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, समन्वय समितीचे अध्यक्ष प्रविण भिलारे, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, सुरेश सावंत, विशाल तोष्णिवाल, तौफिक पटवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.









