वाहतूक शाखेने मग्रुर व्यापाऱ्यांना दिला दे धक्का
प्रतिनिधी / सातारा
सदाशिव पेठेत मोती चौकापासून ते पाचशे एक पाटीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला ज्या दिवशी पार्किंग असेल त्या दिवशी दुकानासमोर लोखंडी जाळय़ा लावण्याची चुकीची प्रथा आहे. दुकानासमोर रस्त्यावर गाडी उभी केल्यावरुन दुकानदारांकडूनच दुचाकीवाल्यांना दमदाटीचे प्रकार घडू लागले आहेत. गाडी चालकांनी वाहतूक शाखेकडे तक्रार करताच वाहतूक शाखेने आज सायंकाळी कारवाई करुन दे धक्का दिला. दरम्यान, अशी कारवाई दररोज करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. एका शिवसेनेच्या चमको कार्यकर्त्यांने चक्क राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावाने दादागिरी केली.
शहरात मोती चौक ते पाचशे एक पाटीपर्यंत मोठी बाजारपेठ समजली जाते. परंतु व्यापाऱ्यांच्याकडूनच नियमाचे तीन तेरा वाजले जात आहेत. अगोदरच पार्किंगला जागा नसल्याची ओरड आहे. खरेदी करण्यासाठी व त्यांच्याच दुकानात येणारे ग्राहक हे साताऱ्याचेच असतात. दुकानाबाहेर गाडी लावतानाच लगेच दुकानातून दमदाटीची भाषा येते. दुकानासमोर गाडी लावू नका. वाहनधारकांकडून विनंती केली जाते. वादावादीचे असे दररोज प्रकार घडतात. त्याला कारण दुकानांच्यासमोर टाकण्यात येणाऱया लोखंडी जाळय़ा. या जाळय़ामुळे दुकानात ग्राहकांना येण्यास अडचण होते असा गैरसमज दुकानदारांचा असल्याने वाहनधारकांना दमदाटीचे प्रकार होतात.
बुधवारी एका वाहनधारकास एका दुकानदारांकडून दमदाटी झाल्याने दुकानासमोरील जाळय़ा काढण्यात याव्यात अशी मागणी वाहतुक शाखेकडे केली. वाहतूक शाखेचे पथक पोहचून त्या पथकाने कारवाई केली. वाहतूक शाखेने लोखंडी जाळय़ा ठेवणाऱया व्यापाऱयांना समज दिली तर पार्किंगमध्ये दुकाने लावणाऱया छोटय़ा व्यवसायिकांना आपली दुकाने पाठीमागे सरकरुन घ्या अन्यथा कारवाई करु अशा सुचना दिल्या. काही दुकानदारांनी आपली दुकाने मागे सरकून घेतली तर काहींनी तशीच ठेवण्यात आल्याने त्यांच्यावर कारवाई केली. रस्त्यात कशाही गाडय़ा उभ्या केल्याने त्या गाडय़ांच्यावरही वाहतूक शाखेने कारवाई केली.
शिवसेनेच्या चमको कार्यकर्त्यांची दादागिरी
शिवसेनेच्या एका चमको कार्यकर्त्याने चक्क ही कारवाई सुरु असताना राज्याचे मी शिवसेनेचा अध्यक्ष आहे. ही कारवाई करु नका, शंभूराज देसाई साहेबांकडेच तक्रार करतो, असे सांगून दादागिरी करु लागला. दुसऱयाही बाजूला कारवाई करा, अशी त्याची धारणा होती. मंत्री शंभूराज देसाई यांना फोन करा, असा हट्टही तो करत होता.
त्याच त्याच गाड्य़ा लागतात सारख्या
जाळय़ा उचलण्याचे आवाहन वाहतूक शाखा करताच काही व्यापाऱयांनी त्याच त्याच गाडय़ा सारख्या लागतात. तुम्ही कारवाई करा, अशी विनंती केली. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी तुमच्याच गाडय़ा अन् तुमच्याच जाळय़ा, जरा तुम्हीच स्वतःची स्वतःला शिस्त लावा, अशा भाषेत सुनावले. दरररोज कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.