गंभीर गुन्हय़ातील तिघांवर पोलीस अधीक्षकांची कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
शहरात गर्दी, मारामारी, दुखापत, शिवीगाळ, दमदाटी, जबरी चोरी, घरात घुसून दुखापत करणारे सौरभ उर्फ लाल्या नितीन सपकाळ (वय 23, रा. रघुनाथपुरा पेठ करंजे), ओंकार रमेश इंगवले (वय 27, रा. देशमुख कॉलनी करंजे पेठ), मंदार हणमंत चांदणे (वय 32, रा. 741, गुरुवार पेठ) यांना जिह्यातून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जिह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी नोव्हेंबर 2022 पासून जिह्यातील 6 टोळयातील 16 जणांना तडीपार केले असून भविष्यातही जिह्यातील सराईत गुन्हेगारांच्याविरुद्ध हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा कडक कारवाया करण्यात येणार आहेत, असे सातारा पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सौरभ सपकाळ, ओंकार इंगवले आणि मंदार चांदणे यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. त्यांना जिह्यातून तडीपार करण्याबाबत शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधीनियम 55 अन्वये प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार त्याची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी मोहन शिंदे यांनी करुन त्याचा अहवाल पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे सादर केला होता. प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्या तिघांमध्ये सुधारणा होत नव्हती. त्यांच्या कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान झाले आहे. कायद्याचा धाक नसून बेकायदेशीर कृत्य करत आहेत. जनतेतून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याकरता मागणी होत आहे. म्हणून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 55 अन्वये तिघांना सातरा जिह्यातून दोन वर्षाकरता हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. याकामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्यावतीने अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलीस नाईक प्रमोद सावंत, पोलीस कॉ. केतन शिंदे, महिला पोलीस कॉ. अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला.








