प्रतिनिधी / सातारा
सातारा शहराला 2021 च्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत अव्वल नंबवर आणायचे आहे. त्याकरता शहरवासियांमध्ये स्वच्छतेची जागृती करण्यासाठी सातारा पालिकेच्यावतीने मनोरंजक अफलातून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छता या विषयावर शॉर्ट फिल्म व पथ नाटय़ सादरीकरणाचा व्हिडिओ पाठवा, विजेत्या तीन संघाचे व्हिडीओ हे पालिकेच्या सामाजिक माध्यमांवर प्रसिध्द करण्यात येतील, असे आवाहन सातारा पालिकेच्यावतीने नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी केले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण या स्पर्धेत सातारा शहराला यावर्षी अग्रस्थानी आणायचे आहे. प्रत्येक शहरवासियांचा हक्कच आहे. प्रत्येकांची जबाबदारी आहे. आपले शहर, आपला परिसर, आपला वॉर्ड हा स्वच्छ ठेवला गेला पाहिजे याकरता पालिकेच्यावतीने स्वच्छतेवर जागृती करण्याच्या अनुषंगाने मनोरंजनात्मक स्पधेचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा शहरात अनेक ग्रुप असे आहेत ते ग्रुप लघुपट, पथनाटय़ सादर करुन सामाजिक प्रबोधन करत असतात. अशा ग्रुपनी या स्पर्धेत सहभागी होवून स्वच्छता या विषयावर लघु चित्रफित व पथनाट्य़ाची 3 ते चार मिनिटांचा व्हिडीओ तयार करुन पालिकेच्या गुगल फार्मवर भरावा, सहभागी होणाऱ्या संघांना ई प्रमाणपत्र पालिकेच्यावतीने देण्यात येणार आहे.
तसेच पहिले तीन क्रमांक पटकावणाऱ्या संघांना सातारा पालिकेच्या सोशल माध्यमावर प्रसिद्धी देण्यात येणार आहे. पथनाटय़ आणि लघुचित्रफित बघायला आवडे, आणि कलाकरांना ती सादर करायला आवडे, सामाजिक विषयावर ही स्पर्धा असल्याने वेळ न या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी केलेले आहे.