५१३ जण कोरोनामुक्त, १९ बळी, उशिरा अहवालात ४६९ बाधित,
सातारा तालुक्यात कहर सुरुच, संसर्ग साखळय़ा तोडण्याचे आव्हान,
६ हजार २११ होम आयसोलेट, भीतीचा पगडा कमी होतोय १८१ जणांचे नमुने तपासणीला
प्रतिनिधी / सातारा
कोरोनाने जिल्हय़ात कहर केला असला तरी जिल्हय़ाचे रहाटगाडगे सकाळी ९ ते सायंकाळी ७ सुरुच आहे. रविवारी रात्री आलेल्या अहवालात जिल्हय़ात ४६९ जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले असून दिवसभरात १९ जणांचा बळी गेला आहे. सध्या अनलॉक प्रक्रियेत अनेक गोष्टी खुल्या झाल्यात. शनिवारी रात्रीपर्यत जिल्हय़ात ३५ हजार ४०१ आहेत. मात्र त्यापैकी साडेपंचवीस हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. सुमारे एक हजार बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या उपचारार्थ ९,२७७ असून त्यापैकी ६२१२ होम आयसोलेट आहेत. तर प्रत्यक्ष हॉस्पिटल व केअर सेंटर्समध्ये ३०६६ उपचार घेत आहेत. बाधित वाढण्याचा वेग कमी होत असला तरी वाढ थांबण्याची गरज आहे. वेग मंदावत असला तरी मात्र निष्काळजीपणा करून चालणार नाही.
दरम्यान, रविवारी संध्याकाळपर्यंत ५१३ नागरिकांना घरी सोडण्यात आले असून १८१ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
५१३ जणांची कोरोनावर मात, मुक्ती ७० टक्क्यांवर
जिल्हय़ात कोरोनामुक्तीचे प्रमाण ७० टक्केंच्या वर असून मृत्यूदर २.९९ असला तरी दररोजच्या पेक्षा बळींचा आकडा १९ एवढा रविवारी कमी आला. रविवारी सायंकाळी आलेल्या अहवालात ५१३ जणांनी कोरोनावर मात केली असून एकूण कोरोना मुक्तांंची संख्या साडे पंचवीस हजार आकडा पार करुन गेली आहे. ही बाब दिलासा देणारी आहे.
जिल्हय़ात ६ हजार २११ होम आयसोलेट
जिल्हय़ात सध्या असलेल्या एकूण उपचारार्थ संख्येपैकी ६ हजार २११ नागरिक होम आयसोलेट असून यापैकी अनेकांचा १०,१४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यावर ते कोरोनामुक्त होणार आहेत. त्याची अधिकृत आकडेवारी प्रशासनाने दिलेली नाही मात्र होम आयसोलेशन उपयुक्त ठरत आहे. भीतीचा पगडा मनावरुन काढून नागरिक कोरोनाला देत असलेली टक्कर चांगलीच आहे. कोरोना योग्य काळजी घेत घरीच बरा होत असल्याचे यामुळे समोर येत असून अधिक संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, हात स्वच्छ धुवणे, रस्त्यावर कोठेही न थुंकणे, सामाजिक अंतर राखणे ही पंचसुत्री पाळली तर जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होवू शकतो.
सातारा तालुक्याला सावरण्याची गरज
सातारा तालुक्यात बाधितांचे प्रमाण वाढत असून सातारा शहर हॉटस्पॉट ठरु लागले असले तरी या तालुक्यात लक्षणे नसलेले पण बाधित असलेले अनेक रुग्ण होम आयसोलेशन पूर्ण करुन कोरोनामुक्त होत आहेत. त्या पाठोपाठ कराड, फलटण, कोरेगाव, खटाव, वाई तालुक्यात रुग्ण वाढत असले तरी मुक्त होणाऱ्यांचे पमाण जिल्हय़ाला दिलासा देत आहे. जावली, महाबळेश्वर, माण, पाटणमध्ये वेग मंदावत असला तरी आता न घाबरता लढा देत जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे हाच काळाचा संदेश आहे.
समाजाची आर्थिक स्थिती बिघडली
सध्या कोरोना स्थितीमुळे शहरात येणाऱया नागरिकांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे शहरातील रिक्षा व्यावसायिक, मजूर, फळविक्रेते, वडापचालक यांच्यासह सर्वच व्यावसायिकांवर आर्थिक मंदीचा परिणाम जाणवत आहे. मात्र सध्या एकमेकांना सहकार्य करत जगणे आणि जगवण्याची गरज असून यामध्ये ऑक्सिजन चळवळ, रुग्णांना सहकार्य करण्याची भावना लढायला बळ देणारी आहे. कोरोना लवकर जावून सगळे काही सुरु व्हावे हीच सर्वांची इच्छा असली तरी त्यासाठी बाधित वाढीचा वेग थांबला पाहिजे. नियम त्यासाठी पाळले पाहिजेत.
बाधितांच्या वाढीने गोंधळस्थिती
सध्या बाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हय़ात गोंधळस्थिती निर्माण झालीय. जिल्हय़ातील ६ हजार २११ होम आयसोलेट लक्षणे नसलेल्या बाधितांच्या संपर्कात राहण्याबरोबरच उर्वरित हॉस्पिटलमध्ये असलेल्या रुग्णांवर उपचार करण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणा पेलत आहे. त्याला खासगी हॉस्पिटलकडूनही तेवढेच सहकार्य होण्याची गरज आहे. लक्षणे नसलेल्या पण बाधित असलेल्या नागरिकांसाठी दिलेला होम आयसोलेशनचा पर्याय चांगला ठरत आह.
१८१ जणांचे नमुने तपासणीला
फलटण येथे ५२, खंडाळा येथे ५८, रायगाव येथे ४९, पानमळेवाडी १७, महाबळेश्वर ५ असे एकूण १८१ जणांचे नमुने पाठवले आहेत.
जिल्हयात १९ बाधितांचा मृत्यू
सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे अपशिंगे सातारा ४८ वर्षीय महिला, डाळमोडी ता. खटाव २९ वर्षीय महिला, देशमुखनगर खोजेवाडी ता. सातारा ६५ वर्षीय महिला, करंजे सातारा ६५ वर्षीय पुरुष, रविवार पेठ सातारा ७३ वर्षीय पुरुष, तसेच खाजगी हॉस्पिटलमधील खातगुण ता. खटाव ६८ वर्षीय पुरुष, गोरेगाव निम ता. खटाव ७८ वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा ८६ वर्षीय महिला, शुक्रवार पेठ कराड ५८ वर्षीय पुरुष, लोणंद ता. खंडाळा ५५ वर्षीय पुरुष, देवापूर ता. माण ५४ वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले पळशी ता. कोरेगाव ६५ वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड ५३ वर्षीय महिला, शिरवडे ता. कराड ७० वर्षीय पुरुष, कोपर्डे हवेली ता. कराड ५८ वर्षीय महिला, उंब्रज ता. कराड ६५ वर्षीय पुरुष, कराड ४८ वर्षीय पुरुष, पसरणी ता. वाई ३८ वर्षीय पुरुष, देगाव ता. सातारा ७५ वर्षीय पुरुष असे एकूण १९ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
रविवारपर्यंत जिल्हयात
एकूण नमुने १,२४, ८०१
एकूण बाधित ३५,८७०
एकूण कोरोनामुक्त २५,५१४
मृत्यू १,०७९
उपचारार्थ रुग्ण ९,२७७
रविवारी
एकूण बाधित ४६९
एकूण मुक्त ५१३
एकूण बळी १९









