जिल्ह्यात 1 लाख 63 हजार ग्राहकांकडून वीजभरणा नाहीच
सातारा / प्रतिनिधी :
कोरोनाच्या महामारीत आर्थिक संकट ओढावल्याने जिल्ह्यात वीज ग्राहकांनी बिलाचा भरणा केलेला नाही. यामुळे महावितरणावर थकबाकीदारांचा भार वाढत आहे. या अत्यंत कठीण अवस्थेत महावितरणचा आर्थिक डोलारा सांभळण्यासाठी तसेच राज्याच्या वीज क्षेत्रातील संभाव्य अरिष्ट टाळण्यासाठी वीजग्राहकांनी चालू व थकीत वीज बिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणाकडून करण्यात येत आहे.
गत वर्षीच्या मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊनमध्ये अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. यामुळे आर्थिक उत्पन्न बंद झाले. यांचा फटका बसल्याने अनेकांचे आर्थिक बजेट कोलमडले. गेल्या एप्रिल महिन्यापासून जिह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील तब्बल 1 लाख 63 हजार वीज ग्राहकांनी एकही महिन्याचे वीजबिल भरलेले नाही. सध्या वीजपुरवठा सुरू असलेल्या या सर्व ग्राहकांकडे तब्बल 91 कोटी 92 लाख रूपयांची थकबाकी आहे. सध्या जिह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 3 लाख 17 हजार ग्राहकांकडे तब्बल 145 कोटी 30 लाख रूपयांची थकबाकी आहे.
लॉकडाऊनमध्ये मीटर रिडींग घेता आले नाही. तर अनलॉक नंतर देण्यात आलेल्या सरासरी वीजबिलांची योग्य दुरूस्ती करण्यात आली. तसेच मीटर रिडींगप्रमाणे वीजबिल देण्याची प्रक्रिया देखील पूर्ववत झाली. अनलॉक नंतर मीटर रिडींगप्रमाणे देण्यात आलेली वीजबिले अचूक असल्याचा निर्वाळा वीजतज्ञांनी देखील दिलेला आहे. सातारा जिल्ह्यातील विभागनिहाय ग्राहकसंख्या (कंसात थकबाकी) पुढीलप्रमाणे सातारा 32806 (18.80 कोटी), कराड 44628 (25.26 कोटी), फलटण 35713 (20 कोटी), वडूज 24305 (11.84 कोटी), व वाई विभागातील 25684 (16.02 कोटी) ग्राहकांचा समावेश आहे.









