सातारा / प्रतिनिधी
ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी ग्रामपंचायतीने लोकसहभागीय पध्दतीने आराखडा तयार करायचा आहे. यामध्ये गावाच्या गरजा, अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांसह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, मनरेगा योजनेची सांगड घालण्याबाबतचे नियोजन करावयाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी केले.
सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने वर्ये, ता. सातारा येथील पंचायतराज प्रशिक्षण केंद्रात आमच गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीचा विकास आराखडा कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी संजय जाधव, राज्य ग्रामीण विकास संस्था, पुणे (यशदा) चे मास्टर ट्रेनर किरण कदम, प्रदीप पाटणकर, स्वप्नील शिंदे, विनोद भागवत उपस्थित होते.
फडतरे म्हणाले, आमच गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीचा वार्षिक विकास आराखडा तयार करताना दारिद्रय निर्मुलन, मानव विकास, सामाजिक विकास, आर्थिक विकास, पर्यावरणीय व वातावरण विषय़क विकास, सार्वजनिक सेवा, सुप्रशासन, कौशल्यवृध्दी, शाश्वत विकासाची ध्येय, स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन इत्यादी बाबींचा एकात्मिक विचार करावा. त्यासाठी ग्रामनिधी, विविध विभागांच्या योजना, मनरेगातून प्राप्त होणारा निधी आणि कामांचे नियोजन करून आराखडा तयार करायचा आहे.
या योजनेंतर्गत निधीची उपलब्धता आणि त्या संपूर्ण निधीचे नियोजन करण्याचे सर्व अधिकारी ग्रामपंचायतींना असल्यामुळे या सर्व कामांचा समावेश ग्राम पंचायत विकास आराखड्यामध्ये करावयाचा आहे. याबाबतची जबाबदारी संबंधित सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी व एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या पर्यवेक्षिका यांच्यावर सोपवण्यात आली आहे, असे फडतरे यांनी सांगितले.
या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास योजनेच्या पर्यवेक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मास्टर ट्रेनरांनी पर्यवेक्षिकांना ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करित असताना त्यांची भूमिका, कर्तव्य आणि जबाबदारीचे प्रशिक्षण दिले.









