जिह्यातील मोठमोठय़ा कंपन्यांचे माल वाहतूकीचे काम एसटीकडे
प्रतिनिधी / सातारा
सातारा जिह्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून गावोगावी जाणारी बस आता बंद झाली आहे. बंद झालेल्या बसेसना काहीतरी काम हवे म्हणून एसटी महामंडळाने काही बसे या खाजगी कंपन्यांची माल वाहतूक करण्यासाठी वळवल्या आहेत. त्यामध्ये सातारा विभागातील 41 बसेस या मोठमोठया कंपन्यांचा मालवाहतूक करण्यामध्ये व्यस्त आहेत. जशी मागणी असेल तशा बसेस कंपन्यांना पुरवठा केला जातो. वाहतूक केली जाते, अशी माहिती एसटी महामंडळाच्या सातारा विभागातून देण्यात आले. कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर लगेच एसटी महामंडळाने सर्व अकरा आगारातील बसेस पूर्णपणे बंद केल्या. त्यानंतर केवळ माल वाहतूकीकरता काही बसेंस वळवल्या गेल्या. त्यानुसार कोकणचा आंबा हा एसटीनेच आणण्यात आला. तसेच सातारा जिह्यातील महत्वाच्या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने गरवारे या कंपनीचा माल हा एसटीनेच पोहचवला जात आहे. तर एसीसी या सिमेंट कंपनीनेही वाहतूक करण्याचे काम एसटी महामंडळाकडे दिले गेले आहे. त्यामुळे सातारा विभागातील 41 बसेस या सेवेत आहेत. त्यामध्ये किलोमीटरनुसार भाडे आकारणी केली जाते. चालकांना वर्दीनुसार काम दिले जात आहे. त्यामुळे सध्या एसटीची मालवाहतूक सेवा तेवढी सुरु आहे. तेही जिह्यातील ज्या मोठया कंपन्या आहेत. त्यांच्याकडून ही वाहतूक केली जात असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.









