मोती चौकात कोंडीने वाहनधारक हैराण
गौरी पुजनाच्या साहित्य खरेदीसाठी झाली गर्दी
प्रतिनिधी / सातारा
गणेशोत्सवाला सूरूवात झाली असून शहरातील मोती चौक ते 501 पाटी या मार्गावर वाहतूक कोंडी वाढत आहे. तासभर वाहने अडकून पडत असताना ही कोंडी सोडवण्याकडे वाहतूक पोलिस दुर्लक्ष करत आहेत. होमगार्डला सूचना करत वाहतूक पोलीस कागदपत्रे तपासत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र या नियमांची पायमल्ली होत असल्याचे शहरातील मोती चौक ते 501 पाटी या मार्गावर दिसत आहे. मंगळवारी गौरी आगमनानंतर आज बुधवार दि. 26 रोजी गौरी पुजन आहे. या पुजनाला लागणारे साहित्य खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा विक्रेते हे पुजेचे साहित्य विकत आहेत. याच मार्गावर दुचाकीचे पार्किंग करण्यात येते. यामुळे हा रस्ता अरूंद झाला आहे.
दुचाकीसह चारचाकी वाहने या मार्गाने जात आहेत. यामुळे कोंडीत प्रचंड वाढ झालेली पहायला मिळत आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी येथे वाहतूक पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत. वाहतूक पोलीस ही कोंडी सोडवण्यापेक्षा वाहनधारकांची कागदपत्र, लायसन्सची तपासणी करत आहेत. कोंडी सोडवण्याचा भार होमगार्ड यांच्या खांद्यावर येवून पडला आहे. होमगार्ड यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.









