१५ आँगस्ट रोजी नाही होणार ग्रामसभा
गोडोली/ प्रतिनिधी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या लेबर बजेटवर चर्चा आणि अंतिम कृती आराखड्याला १५ आँगस्ट रोजी ग्रामसभा न घेता आता मासिक सभेत अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे. यापूर्वी ग्रामसभा घेण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यात आल्याचे नियोजन विभागाने जाहीर केले आहे.
कोरोनाच्या धास्तीने ग्रामविकास विभागाने पुढील आदेशापर्यंत ग्रामसभांना स्थगिती दिली आहे. मात्र रोजगार हमी योजना अंतर्गत तयार करावयाचे २०२१- २०२२ चे नियोजन व वार्षिक कृती आराखडा तयार करण्यासाठी नियोजन विभागाने १५ आँगस्ट रोजी ग्रामसभा घेण्याचा ग्रामविकास विभागाच्या परस्पर आदेश दिले. ग्रामसभा घ्यायची की नाही, याबाबत चांगलाच संभ्रम निर्माण झाला असताना अखेर लेबर बजेट बाबतीत नागरिकांच्या सुचना घेऊन त्यावर मासिक सभेत अंतिम चर्चा आणि आराखड्याला मंजुरी देण्यात यावे, असे नव्याने आदेश दिले आहेत. तरुण भारत ने ग्रामविकास विभागाच्या परस्पर अन्य विभागाने ग्रामसभा घेण्याचे आदेश दिल्याने झालेला संभ्रम उघड केला होता.
ग्रामसभा न घेता ग्रामस्थांचे लेखी सुचना घेवून ग्रामपंचायतीने मासिक सभेमध्ये चर्चा करुन शासनाच्या सुचनांचे पालन आणि आवश्यक ती पुढील कार्यवाही होणार आहे.यावेळी ग्रामसभेत नाही तर ग्रामपंचायतीच्या सभेत वार्षिक कृती आराखडा २०२०- २१ ला मंजुरी मिळणार आहे. लेबर बजेटच्या मार्गदर्शक सुचना व वैयक्तिक लाभांची कामे देण्याकरिता पात्र लाभार्थ्यांबाबत मार्गदर्शक सुचना व प्रारुप जेष्ठता यादी , गावातील सर्व शासकिय कार्यालयातील नोटीस फलकावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.आता वित्त आयोगाबरोबर गावाच्या सर्वांगिण विकासासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेचा लाभ सरपंच आणि सदस्यांनी उठविण्याची संधी मिळाली आहे.
Previous Articleज्येष्ठ शायर राहत इंदौरी यांचे निधन
Next Article पाच लाख शेतकऱ्यांचे ‘मातोश्रीला पत्र’ आंदोलन








