अपशिंगे मंडल कार्यालयाचा अजब कारभार
प्रतिनिधी / नागठाणे
अपशिंगे (मि.) ता. सातारा येथे रस्त्याच्या कामांसाठी मुरूम वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर-ट्रॉली येथील महसूल विभागाने अडवले होते. मात्र तहसीलदारांचा नुसता फोन आल्यावर त्यांच्यावर कोणतीच कारवाई न करता दोन तासांनी त्यांना सोडून देण्यात आले. सोमवारी दुपारी ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या महिनाभरापासून अपशिंगे (मि.) ते देशमुखनगर या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम एका खाजगी ठेकेदारामार्फत सुरू आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या भरण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या साईडपट्ट्या भरण्यासाठी हा ठेकेदार रस्त्यालगतच चर काढून तेथील मुरूमाचा वापर करत आहे.
सोमवारी दुपारी अपशिंगे मंडलाचे तलाठी निलेश जाधव, नांदगावचे तलाठी उमेश पाटणकर व वेणेगावचे तलाठी कैलाश भोसले यांनी अशी मुरूम वहातुक करणारे दोन ट्रॅक्टर अडवले. त्यांच्याकडे मुरूम वाहतुकीचा परवाना, रॉयल्टी भरलेल्या पावत्यांची मागणीही केली. मात्र ट्रॅक्टर चालकांकडे सुमारे दोन तास चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे नसल्याचे निदर्शनास आले. तरीही फक्त एका फोनवर तलाठ्यांनी या दोघांना कोणतीही कारवाई न करता सोडून दिली.
याबाबत अधिक माहिती घेतली असता तहसीलदार मॅडमचा एक फोन आल्यावर त्यांना सोडण्यात आल्याचे समजते. इतरवेळी सर्वसामान्य शेतकऱ्याने स्वतःच्या रानात माती लेव्हलींग करताना वहातुक केली तरी रॉयल्टी, नियमांचा बडगा दाखवून कारवाई करत त्यांची वहाने जप्त करण्याची तत्परता दाखविणाऱ्या या मंडल कार्यालयाने सोमवारी अडविलेल्या या दोन वाहनांजवळ तसेच ठेकेदाराच्या माणसाजवळ कोणतीही कागदपत्रे नसताना वरिष्ठांच्या एका फोनवर सोडून देण्यात धन्यता मानली. त्यामुळे सातारा महसूल विभाग या ठेकेदारावर एवढा प्रसन्न का ? याचीच खुमासदार चर्चा परिसरात सध्या सुरू आहे.
या घटनेची माहिती प्रसारमाध्यमांना समजल्यावर पत्रकारांनी अपशिंगे तलाठी व मंडलाधिकाऱ्यांना मंगळवारी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही. बुधवारी सकाळी मंडल कार्यालयात माहिती घेतली असता याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठविल्याचे सांगितले. हे दोन्ही ट्रॅक्टर तहसीलदार यांचा फोन आल्यानंतर सोडण्यात आले असल्याचेही तलाठी निलेश जाधव यांनी सांगितले. विशेष म्हणजे सोमवारच्या कारवाईचा हा अहवाल केवळ सात ओळीत पाठवला असून तो सोमवारी तात्काळ न पाठवता मंगळवारी प्रसिद्धी माध्यमांना या घटनेची माहिती समजली आहे हे कळाल्यानंतर पाठवण्यात आला आहे. त्यामुळे यामागचे नेमके गौडबंगाल काय ? याची चर्चा सुरू आहे.









