परवानगी नसतानाही एसटीचा अनधिकृत थांबा
पाहणी करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कानाडोळा
प्रतिनिधी / नागठाणे
पुणे -बेंगलोर महामार्गावरील माजगाव फाटा (अतीत) येथील हॉटेल राजमुद्रा येथे परवानगी नसतानाही राज्य परिवहन महामंडळांच्या बसेस अधिकृतरित्या मोठ्या प्रमाणावर थांबत आहेत. त्यामुळे येथे प्रवाश्यांच्या होत असलेल्या गर्दीमुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत आहे. त्यामुळे कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून हा संपूर्ण प्रकार माहीत असूनही सातारा आगाराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हॉटेलचालकाला पाठीशी घालण्याचा प्रकार होत आहे.
सुमारे सात महिन्यांपूर्वी कोरोना साथरोगामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसची बंद करण्यात आल्या होत्या. नुकतीच राज्यशासनाने महामंडळाला राज्यांतर्गत लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू करण्याची परवानगी दिली. त्या अनुषंगाने सध्या लांब पल्ल्यांच्या बसेसच्या फेऱ्या सुरू झाल्या. मात्र, या फेऱ्या सुरू करताना महामंडळाने या बसेस फक्त मार्गावरील बसस्थानकांवर थांबविण्याचेच आदेश राज्यातील सर्व आगरप्रमुखाना दिले होते.
बसस्थानाकाव्यतिरिक्त महामंडळाने नेमलेल्या अधिकृत खाजगी हॉटेल्सवर अथवा कोणत्याही खाजगी हॉटेल्सवर एसटी बसेस थांबवू नये अश्या सक्त सूचनाही देण्यात आल्या होत्या. असे असतानाही माजगाव फाटा येथील हॉटेल राजमुद्रा या हॉटेलवर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर एसटी बसेस बसचालक व वाहकांकडून अनधिकृतरीत्या थांबवल्या जात आहेत. महामार्ग क्रॉस करण्याची परवानगी नसतानाही अनेक बसचालक व वाहक प्रवाश्यांचा जीव धोक्यात घालून चक्क महामार्ग क्रॉस करून येथे थांबत आहेत. महामार्ग प्राधिकरण व जिल्हा पोलिस दलाने सर्वेक्षण करून माजगाव फाटा हा ‘ब्लॅक पॉईंट’ (अपघातप्रणव क्षेत्र) म्हणून घोषित केले आहे.तरीही या हॉटेलचालकाकडून चालक व वाहकाना देण्यात येत असलेल्या पैश्याच्या अमिषामुळे हा सर्व प्रकार घडत असून दिवसभरात येथे सुमारे १२५ ते १५० एसटी बसेस अनाधिकृतरीत्या थांबत आहेत.
त्यामुळे या हॉटेलवर प्रवाश्यांची मोठी गर्दी पहावयास मिळत असून येथे सोशल डिस्टंगशनचा फज्जा उडाला आहे. कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे राज्य शासन आटोकाट प्रयत्न करत असताना येथे मात्र नियमांना तिलांजली देण्यात येत आहे.या घटनेची माहिती सातारा आगाराच्या विभाग नियंत्रकांना याची माहिती मिळाल्यानंतन त्यांनी या ठिकाणी गुप्तपणे भेटही दिल्याचे समजते. त्यांनी एक तास येथे एसटी बसेस कश्याप्रकारे महामार्ग क्रॉस करत आहेत? कश्या प्रकारे मोठ्या प्रमाणात एसटी बसेस येथे थांबत आहेत? याची पहाणीही केली.त्यानंतर कारवाईसाठी पथकही पाठवले.मात्र या पथकाने या हॉटेलचालकाकडून स्वतःचा खिसा गरम करण्यातच धन्यता मानली.त्यामुळे या हॉटेलचालकवर महामंडळाचे वरीष्ठच ‘प्रसन्न’ असल्याची चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू आहे.









