नागठाणे / प्रतिनिधी :
सातारा तालुक्यातील भाटमरळी गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यापुढे जात गावच्या कारभाराची धुरा त्यांनी महिलांच्या हाती सोपविली आहे. गावच्या या आगळ्या निर्णयाचे सर्वत्र कोैतुक होत आहे.
भाटमरळी हे शेंद्रे गटातील गाव. या गावाने यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. येथील ग्रामपंचायतीच्या एकूण सात जागा आहेत. त्यातील तीन जागा सर्वसाधारण खुल्या, तीन जागा इतर मागासवर्ग अन् एक जागा अनुसूचीत जाती प्रवर्गासाठी आरक्षित होत्या. त्या दृष्टीने येथील ग्रामस्थांनी सर्वानुमते यंदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यापुढे जात या सर्व जागांवर महिला उमेदवारांना संधी देण्याचे ठरविण्यात आले. इच्छुक पुरुष उमेदवारांनीही गावच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यानंतर मीना सुभाष देशमुख, निर्मला माणिक चव्हाण, नीलम प्रताप जाधव, मीनल गजानन जाधव, मोनाली भीमराव जाधव, गौरी सचिन क्षीरसागर, सुष्मिता राहुल अडागळे या सात महिला सदस्यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
बिनविरोधची परंपरा
शेतीच्या समृद्धीबाबत भाटमरळी गाव अग्रेसर आहे. धार्मिक, आध्यात्मिक दृष्टीनेही गावाला मोठी परंपरा लाभली आहे. पारंपरिक खेळातही गावचा लोैकिक आहे. गेली २५ वर्षे गावात ग्रामपंचायतीची निवडणूक ही बिनविरोध होत आहे. हीच परंपरा यंदाही गावाने यशस्वीपणे जोपासली आहे. त्यापुढे आणखी एक पाऊल टाकताना यंदा सत्तेची धुरा महिलांच्या हाती सोपविली आहे.









