716 बाधित, 855 मुक्त
कोरोनामुक्ती 14 हजारांच्या उंबरठ्यावरमृत्यूदर वाढतच चाललाय
जंबो हॉस्पिटल उभारणीला वेग कधी संपणार हा कोरोना ?
वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शन वाढले
जिल्हय़ात 3 हजार 864 होम आयसोलेट
प्रतिनिधी / सातारा
जिल्हय़ात बाधितांच्या संख्येने 22 हजाराचा आकडा पार केला असून त्यात नवीन बाधितांची दररोज भर पडत आहे. तर दुसरीकडे कोरोनामुक्तीचा वेगही दिलासा देत असला तरी वाढत्या संख्येने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सातारा, कराडसह जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला असून मृत्यूदर वाढतच चालला असल्याने चिंता व्यक्त होत आहे. कधी संपणार हा कोरोना एवढाच प्रश्न सर्वांच्या मनात आहे. तर सध्या तापमान प्रचंड वाढल्याने व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण वाढले आहेत. मात्र दवाखान्यात जावे की न जावे अशी द्विधा अवस्थाही लोकांच्या मनात आहे. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारण्यात येत असलेल्या जम्बो हॉस्पिटल उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार 800 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर शुक्रवारी 17 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील 855 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे तर रात्री उशिरा आलेल्या अहवालात 716 एवढ्या जणांचा अहवाल बाधित आला असल्याची डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
855 नागरिकांची कोरोनावर मात
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 855 नागरिकांना शुक्रवारी घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनामुक्तीचा एकूण आकडा 14 हजाराच्या उंबरठ्यावर उभा आहे. आजपर्यंत एकूण 13 हजार 937 जणांनी कोरोनावर मात करत कोरोनाला हरवले आहे.
सातारा तालुक्यात बळींची संख्या जास्त
कोरोनाचा हॉटस्पॉट पहिल्यापासून कराड तालुका ठरला मात्र आजपर्यंत तिथे मृत्यूदर कमी राहिला आहे. आजपर्यंत कराड तालुक्यात एकूण कोरोना बळींचा आकडा 95 आहे. तिथे बाधितांची संख्या जास्त आहे. तर साताऱयात कराडपेक्षा बाधितांची संख्या कमी असली तरी कोरोना बळींची संख्या 156 एवढी जिल्हय़ात सर्वात मोठी आहे. वाई 59, खटाव 44, पाटण 43, फलटण 39, खंडाळा 23, जावली 21, कोरेगाव 31, माण 14 आणि सर्वात कमी बळींची संख्या महाबळेश्वर तालुक्यात 8 एवढी आहे. जिल्ह्यात एकूण कोरोना बळींची संख्या 599 असून ती 600 च्या उंबरठ्यावर उभी आहे.
टायफड झाला पण उपचार कोरोनावर ?
टायफड झाल्याने सातारा शहरातील एका 52 वर्षीय व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय पथकाने त्याच्यावर कोरोनावरचे उपचार सुरू केले असल्याचा दावा त्या रुग्णाने त्याच्या नातेवाईकांकडे केला आहे. अशा प्रकारचा दावा झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील हा प्रकार समोर आलाय. बुधवार दि. 9 रोजी या व्यक्तीला टायफड सदृश्य लक्षणे दिसून आल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय पथकाने त्याला दाखल केल्यानंतर प्रथम त्याचा स्वॉब घेतला. त्यानंतर त्याला थेट कोरोना रुग्णांच्या वॉर्डमध्ये दाखल केलेय. मात्र, त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह वा पॉझिटिव्ह नेमका काय आलाय याबाबतची त्याला माहिती न देता त्याच्यावर थेट कोरोनावरचे उपचार सुरू केला असल्यामुळे तो पुरता हादरून गेला आहे.
जिल्हय़ात 3 हजार 864 होम आयसोलेट
लक्षणे नसलेले मात्र बाधित अहवाल आलेले 3 हजार 864 नागरिक जिल्हय़ात होम आयसोलेट असून यातील काहींचा 10 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर ते कोरोनामुक्तही होतील. मात्र, होम आयसोलेट रुग्णांसह नातेवाईकांना समाजाकडून विचित्र वागणूक देण्यात येत असल्याच्या घटना घडत असून त्या घडू देवू नका. कारण आपल्याला आजाराविरुध्द लढायचे आहे, आजारी माणसांशी नाही हे जिल्हय़ातील नागरिकांनी ध्यानात ठेवावे. सध्या जिल्हय़ात उपचारार्थ रुग्ण संख्या 8 हजार 483 एवढी दिसत असली तरी प्रत्यक्षात ती 3 हजार 747 एवढी असून यातील काही शासकीय व खासगी हॉस्पिटलात तर विविध कोरोना केअर सेंटरमध्ये 1168 क्वारंटाईन आहेत.
लॉकडाऊन करुन जिल्हा कोरोनामुक्तीचे स्वप्न
जिल्हय़ात सध्या अनेक ठिकाणी स्वयंस्फुर्तीने लॉकडाऊन करुन जिल्हा कोरोनामुक्त करण्याचे स्वप्न पाहिले जात आहे. संसर्ग रोखण्यासाठी ही नागरिकांची सुरु असलेली धडपड पाहता यात यश यावे हीच प्रत्येकाची भावना आहे. मात्र, त्यासाठी सामाजिक अंतर राखणे, गर्दीच्या ठिकाणी, दवाखान्यात गेल्यावर मास्क वापरणे, हात स्वच्छता धुवण्याबरोबरच योग्य आहार, विहार आवश्यक असून पुढील काही दिवसात या गोष्टी केल्यास जिल्हा कोरोनामुक्त होवू शकतो.
प्रथम भीती घालवण्याचे काम करा
कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला की रुग्णाच्या मनात भीती निर्माण होत आहे. कोरोना बरा होतो. हजारोच्या संख्येने नागरिक कोरोनामुक्त होत असल्याचे समोर येत असले तरी प्रशासनासह मेडिकल क्षेत्रातील तज्ञांनी पुढाकार घेवून नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याची गरज भासू लागलीय. टेस्ट वाढवल्यात पण कोरोनाही वाढतोय मग टेस्टच नको अशी धारणाही होत आहे. जर काही त्रासच होत नसेल तर नागरिकांची ती भावनाही नाकारण्यात अर्थ नाही. यातील गोंधळाचे वातावरण दूर करण्याची मागणी सजग नागरिकांनी केली आहे.
जिल्हय़ात 17 बाधितांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालय सातारा येथे खोजेवाडी सातारा 65 वर्षीय पुरुष, माजगावकर माळ सातारा 65 वर्षीय महिला, खोडशी, ता. कराड 65 वर्षीय महिला, पानमळेवाडी 78 वर्षीय पुरुष, वाई 55 वर्षीय पुरुष, पंचशिलनगर ता. खंडाळा 50 वर्षीय पुरुष, मोरघर ता. जावली 65 वर्षीय पुरुष, सातारा 50 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा 60 वर्षीय पुरुष, तसेच विविध खासगी हॉस्पीटलमध्ये मध्य सायगाव ता. जावली 56 वर्षीय पुरुष, खेड माळवी सातारा 52 वर्षीय पुरुष, अंबवडे ता. खटाव 57 महिला, जाखणगाव ता. खटाव 69 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर फलटण 70 वर्षीय महिला, सवादे, कराड 70 वर्षीय पुरुष, दौलत कॉलनी शनिवार पेठ कराड 56 वर्षीय महिला, ओंड 57 वर्षीय महिला असे एकूण 17 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
1162 जणांचे नमुने तपासणीला
सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 50, उपजिल्हा रुग्णालय कराड 20, उपजिल्हा रुग्णालय फलटण 85, कोरेगाव 73, वाई 103, खंडाळा 160, रायगाव 3, पानमळेवाडी 141, मायणी 100, महाबळेश्वर 60, पाटण 14, दहिवडी 50, खावली 90, तळमावले 26 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 187 असे एकूण 1162 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
शुक्रवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 53,628
एकूण बाधित 22,863
एकूण कोरोनामुक्त 13,937
मृत्यू 599
उपचारार्थ रुग्ण 8,327
शुक्रवारी
एकूण बाधित 716
एकूण मुक्त 855
बळी 17









