●पाच तालुक्यात प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून महिलांकडे पदभार
●पदोन्नती नसल्याने रिक्त जागा
●महाबळेश्वर, खंडाळा येथे ही रिक्त पद
●मासिक मिटिंगच्या अगोदर सातारचे गटशिक्षणाधिकारी रजेवर
सातारा / प्रतिनिधी
जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण विभागात अनेक पदे रिक्त आहेत. विस्तार अधिकारी यांची पदोन्नती रखडली आहे. रिक्त पदावर नवीन गटशिक्षणाधिकारी आले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील रिक्त असलेल्या चार तालुक्याचा पदभार महिला विस्तार अधिकारी यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी म्हणून आला आहे. तर सातारा पंचायत समितीची मासिक सभा दि.28रोजी आल्याने सदस्यांच्या होणाऱ्या आरोपाला सामोरे जायला नको म्हणून गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी रजा काढली असल्याने त्यांच्या जागी महिला विस्तार अधिकारी जयश्री शिंगाडे यांच्याकडे पदभार आला आहे.
सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे 2772 शाळा आणि सुमारे दहा हजार शिक्षक व लाख विद्यार्थी आहेत. शिक्षण विभागात अनेक पदे रिक्त आहेत. विशेष करून उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांची पदे रिक्त आहेत. अशा अपुऱ्या संख्या बळावर अतिशय चांगले काम विध्यमान प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांचे सुरू आहे. नेटके नियोजन करत त्या शिक्षण विभाग चालवत आहेत. सध्या सातारा जिल्ह्यात खटाव आणि माण या दोन तालुक्यात गेल्या पाच वर्षापासून गटशिक्षणाधिकारी नाहीत. 2018 पासून महाबळेश्वर गटशिक्षणाधिकारी पद नाही. तेथील पद विस्तार अधिकारी आनंद पळसे यांच्याकडे पदभार आहे. खंडाळा येथे ही 2019 पासून पद रिक्त आहे. तेथे विस्तार अधिकारी आडे यांच्याकडे पदभार आहे.पाटणचे गटशिक्षणाधिकारी आर.पी.निकम यांची गडचिरोली येथे 2019 ला बदली झाली. त्यांच्या जागेवर नवीन कोण आले नसल्याने विस्तार अधिकारी दीपाली बोरकर यांच्याकडे पदभार आहे. जावलीचे गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांना पदोन्नती मिळाल्याने रिक्त पद आहे.तेथे पदभार विस्तार अधिकारी कल्पना तोरडमल यांच्याकडे गेला आहे. माणला रिक्त असलेल्या जागेवर विस्तार अधिकारी सोनाली विभूते यांच्याकडे पदभार आहे. खटाव तालुक्याचा पदभार विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे यांच्याकडे आहे.कराडला गटशिक्षणाधिकारी श्रीमती मुजावर यांच्याकडे पदभार आहे.पदोन्नतीच झाली नसल्याने आणि रिक्त जागा असल्याने सगळी अडचण निर्माण झाली आहे. खाते अंतर्गत गटशिक्षणाधिकारी या पदाची परीक्षा 13 जुलै 2017 झाली होती.त्याचा ही निकाल नाही.2014पासून केंद्र प्रमुख यांना पदोन्नती नाही.अशा परिस्थितीत शिक्षण विभागाची दोरी महिला अधिकाऱ्यांच्या हाती आहे.
सातारचे गटशिक्षणाधिकारी मासिक सभेच्या धास्तीने रजेवर?
सातारा पंचायत समितीच्या मासिक सभेत शिक्षण विभागाने केलेल्या कारभाराचा पर्दाफाश पंचायत समिती सदस्य नेहमी करतात.त्यामुळे नेमकी मासिक सभा जवळ आली की गटशिक्षणाधिकारी हे रजेवर जातात असे सूत्र आहे.उद्या पंचायत समितीची मासिक सभा आहे.ही सभा ऑन लाईन होत असली तरी पंचायत समितीचे सदस्य गटशिक्षणाधिकारी धुमाळ यांची कोंडी करणार हे निश्चित आहे.त्यामुळे ते दि.1पर्यंत रजेवर गेले आहेत.त्यामुळे आपोआपच पदभार विस्तार अधिकारी जयश्री शिंगाडे यांच्याकडे आला आहे.









