सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यातील 65 प्राथमिक आरोग्य केंद्रावर उद्यापासून (दि.8) कोरोना लसीकरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
केंद्र व राज्य सरकारच्या सुचनेनुसार 1 मार्चपासून देशभरात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच 45 ते 59 वर्ष वयोगटातील इतर आजार असलेल्या व्यक्तींना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातही हे लसीकरण सुरू असून, उद्यापासून (दि.8) 65 आरोग्य केंद्रातही ही लस उपलब्ध होणार आहे. यापूर्वी 79 शासकीय व 10 खाजगी ठिकाणीच लसीकरण सुरू होते.
ठोसेघर, येवती, केरळ, मुरुड, सळवे, सणबुर, सोनावडे ही प्राथमिक आरोग्य केंद्र वगळता जिल्ह्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्रावर लस दिली जाईल. तसेच नागरी आरोग्य केंद्र गोडोली, कस्तुरबा सातारा व कराड या शासकीय रुणालयात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळीत लसीकरण मोफत देण्यात येत आहे.









