अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत अनेक तक्रारी
प्रतिनिधी / सातारा
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सूरू असून या प्रक्रियेबाबत अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कॉलेजची तपासणी करण्यासाठी शिक्षण विभागाच्या आठ पथकांनी अचानक भेट दिली. प्रवेश प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील सातारा, पाटण, कराड, दहिवडी, वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण येथे सुरू असलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेची माध्यमिक विभागाच्या आठ पथकांनी अचानक भेट देऊन तपासणी केली. या पथकांमध्ये उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांचा समावेश होता. तपासणीदरम्यान, प्रवेश प्रक्रियेसाठी सुरू असलेली पद्धत, गर्दी होऊ नये, यासाठी केलेल्या उपाययोजना, मंजूर क्षमता व प्राप्त अर्ज, लिंक व वेबसाईटची माहिती घेतली.
यासोबत शुल्क आकारणी व त्याबाबतचे शिक्षक पालक संघाच्या सभेचे इतिवृत्त, मदतकक्ष, विनाअुनदानित प्रवेश, दिव्यांगांची व्यवस्था, प्राचार्याचे प्रवेश प्रक्रियेवरील स्वत:चे नियंत्रण, गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यासाठी केलेली व्यवस्था यासह अनुषंगिक बाबींची तपासणी करण्यात आली. यशवंतराव चव्हाण इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स कॉलेजमध्ये शिक्षणाधिकारी क्षीरसागर यांनी अचानक भेट देऊन प्रवेश प्रक्रियेची तपासणी केली. माध्यमिक महाविद्यालयांनी अकरावीची प्रवेश सुरळीत पार पाडावी. अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा शिक्षणाधिकारी क्षीरसागर यांनी दिली.