प्रतिनिधी / सातारा
राज्यातील नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेतनासाठी दरमहा 1 तारखेपर्यंत अनुदान मिळत नाही. तसेच 2016 मधील जानेवारी 19 ते ऑक्टोबर 19पर्यंतचे थकीत अनुदान दिले गेले नाही. ते अनुदान तात्काळ देण्यात यावेत. पालिका कर्मचाऱ्यांचे पगार थेट कोषागारामार्फत करण्यात यावा, तसेच सर्व कर्मचाऱ्यांना सेवार्थ प्रणाली लागु करण्यात यावी, यासाठी टप्याटप्याने महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भाऊसाहेब पाटील यांनी दिली.
सातारा पालिकेतील सर्वच कर्मचाऱयांनी काळय़ा फिती लावून काम करुन निषेध नोंदवला. या आंदोलनाबाबत माहिती देताना सातारा पालिकेचे अभियंता भाऊसाहेब पाटील म्हणाले, आमची संघटना ही पालिका कर्मचाऱयांच्या हितासाठी आंदोलन करत आहे. राज्य पातळीवर दि. 1 मार्च 2021 ला ढोल बजावो आंदोलन करण्यात आले होते. राज्यातील 60 हजार सफाई कामगार, पाणी पुरवठा व इतर 30 हजार कामगारांच्या उपासमारीकडे मुख्यमंत्री, नगरविकास मंत्र्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव न्याय मागण्यांसाठी टप्याटप्याने हे आंदोलन राज्यभर सुरु आहे.
त्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगाचे फरक हप्ते तात्काळ देण्यात यावेत, तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱयांना प्रलंबीत देणी तात्काळ देण्यात यावीत, राज्यातील नगरपंचायतीमधील उदघोषणे पुर्वीची व नंतरच्या राहिलेल्या सर्व कर्मचाऱयांचे विनाअट समावेशन करण्यात यावे. सेवानिवृत्तीसाठी ग्रामपंचायतीची सेवा ग्राह्य धरण्यात येवून सेवानिवृत्तीचे सर्व लाभ देण्यात यावेत, 2005 नंतरचे राज्यसेवा संवर्गातील नियुक्त झालेल्या कर्मचाऱयांना डीजीपीएस, एनपीएस योजना रद्द करुन जुनी पेन्शन पूर्ववत करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.