प्रतिनिधी/वाई
आगामी काळात गरजेनुसार खासगी रुग्णालये प्रशासनाच्या ताब्यात घेण्यात येणार आहेत. या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णासाठी काळजी केंद्र व कोरोना आरोग्य केंद्र उभारण्याची योजना असल्याचे जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी सांगितले.
कोरोना संसर्गाचा वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्रशासनाने उपविभागीय कार्यालय स्तरावर व काही ठिकाणी तालुका स्तरावर कोरोना केअर सेंटर उभारण्यात येत आहेत. याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी वाई व महाबळेश्वर येथे भेट दिली. यावेळी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तहसीलदार रणजित भोसले(वाई), सुषमा पाटील (महाबळेश्वर) पालिकेच्या मुख्याधिकारी विद्या पोळ (वाई), अमिता पाटील (महाबळेश्वर), रेडक्रॉस सोसायटीचे फादर टॉमी, राबर्ट मोझेस, संजीवनी कद्दु, विद्याधर घोटवडेकर, उदयकुमार कसुरकर, डॉ.संदीप यादव आदी उपस्थित होते.
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपविभागीय कार्यालय अथवा तालुका त्रीस्तरीय तयारी करण्यात येत आहे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांना चौदा दिवस विळीगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. वाई उपविभागात पाचगणी, तळदेव, वाई येथे अशा प्रकारची सोय करण्यात आली आहे.वाई पाचगणी (३३)तळदेव (३०) अशा जणांना विलीगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आले आहेत परंतु त्यांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे. अशा रुग्णांची भरती कोरोना केअर सेंटर मध्ये करण्यात येणार आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
यादौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी वाई येथील किसन वीर महाविद्यालय येथे उभारण्यात आलेल्या विलीगीकरण केंद्र, पाचगणी व तळदेव (ता महाबळेश्वर)येथील केंद्राची पाहणी केली. त्याच बरोबर वाई येथे आरोग्य केंद्र उभारण्यात येणाऱ्या मिशन हॉस्पिटल,गीतांजली हॉस्पिटल ,महाबळेश्वर येथील महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या परिसराची पाहणी केली.ज्या खाजगी डॉक्टर व परीचारिकाना या कामात मदत करायची आहे त्यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले.यावेळी राजेश झेले व पांडुरंग भिसे आदी उपस्थित होते.








