प्रतिनिधी / सातारा :
पुण्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात आनेवाडी व तासवडे टोलनाक्यावर एमएच 11 व एमएच 50 या वाहनांना टोलमाफी द्यावी. या नागरिकांच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पूर्णपणे पाठींबा आहे. या संदर्भात सर्वपक्षीय आंदोलन उभे राहिल्यास त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस त्यात सहभागी होईल, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकाद्वारे सांगितले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी ज्याप्रमाणे खेड शिवापूर टोलनाक्याबाबत आंदोलनाची भूमिका घेवून एमएच 12 व एमएच14 या वाहनांसाठी टोलमाफीचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे सातारा जिह्यातील आनेवाडी व तासवडे टोलनाक्याबाबत टोलमाफीचा निर्णय घेऊन एमएच 11 व एमएच 50 या वाहनांना टोल माफी मिळावी. त्याबाबत आंदोलनाची भूमिका घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पाठींबा आहे. पुणे-सातारा या महामार्गाचे काम सुरु होवून बराच काळ लोटला असून, सदरचे काम संबंधित कंत्राटदाराने वेळेत पूर्ण केले नाही. केंद्र सरकारने संबंधित कंत्राटदाराला वारंवार मुदत वाढवून देवूनही अद्याप काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे नागरिकांनी टोल का द्यावा. तसेच सेवा रस्ते व महामार्गाची दुरावस्था स्थानिकांसाठी टोल सवलत याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक वेळा बैठका झाल्या. परंतु, संबंधित अधिकारी व ठेकेदार हे जिल्हा प्रशासनाला अजिबात जुमानत नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासक हे प्रश्न सोडवू शकत नाहीत. तसेच टोलनाक्यावर भ्रष्टाचार बोकाळला आहे.
टोलनाक्यावर बोगस पावत्यांचा भ्रष्टाचार नुकताच उघड झाला आहे. याबाबतीत प्रशासनाने खऱ्या सुत्रधारावर कारवाई करणे गरजेचे आहे. खेड शिवापूर येथील टोल नाक्यावर स्थानिकांना टोलमध्ये सवलत मिळावी म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेवून स्वतःच्या पातळीवर हा प्रश्न सोडवला. त्यामुळे एमएच 12 व एमएच 14 या वाहनांना टोलमाफी मिळाली. खासदार सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणेच साताऱ्यातील दोन्ही खासदारांनी आनेवाडी व तासवडे या दोन्ही टोलनाक्यावर एमएच 11 व एमएच 50 पासिंग असलेल्या वाहनांना टोलमाफीसाठी कठोर भूमिका घ्यावी, ही टोलमाफी आंदोलनाबाबत आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर सर्वांशी चर्चा करुन व सर्वांना सोबत घेवून हा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहकार्य राहिल, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे.









