सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2022 पर्यंत देशात प्रत्येकाचे स्वतःचे घर असेल, हे स्वप्न पाहत घरकूल योजना जाहीर केली आहे. या योजनेचा शासकीय स्तरावर पाठपुरावा होत नसल्याने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कृती समितीने यासाठी पुढाकार घेतला आहे. घर नसलेल्या सर्व जातीधर्मातील लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ देण्यासाठी आम्ही काम करत आहे. यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले.
घर नसलेली अनेक कुटुंब या समाजात आहेत. केंद्र शासनाने घरकूल योजना सुरु केली आहे. मात्र, ती लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. त्यांचा सर्व्हे आण्णाभाऊ साठे कृती समितीने सुरु करुन लाभार्थ्यांची यादी तयार केली आहे. या लाभार्थ्यांचा मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पर्ल हॉलमध्ये झाला. यावेळी चव्हाण बोलत होते.
चव्हाण पुढे म्हणाले, जिल्ह्यातील ज्यांना स्वतःची घरे नाहीत त्यांना केंद्र शासनाच्या धोरणानुसार घरकूल मिळाली पाहिजेत. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कृती समितीने सामाजिक बांधिलकीतून याचा सर्व्हे सुरु केल्यावर विविध जातीधर्मातील घर नसलेल्या कुटुंबांची माहिती समोर आली. त्याची यादी तयार करुन घरकूल योजनेचा लाभ देण्याबाबतचा प्रस्ताव पालकमंत्री, खासदार, आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. या सर्व घटकांनी जिल्ह्यात घरापासून वंचित कुटुंबांना न्याय देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
यावेळी जिल्हाभरातील घरकूलापासून वंचित असलेल्या कुटुंबातील महिला, नागरिक तसेच दलित महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, अजय राठोड, महिबूब मुल्ला, उज्ज्वला जगदाळे, सुजाता गायकवाड, ओंकार निकम, विमल शिंदे या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.









