अचूक बातमी “तरुण भारत” ची, रविवार, 25 एप्रिल 21, दुपारी 12.00
● पॉझिटिव्हिटी रेट 32.02 ● कोरोना बळींचे सत्रही थांबेना ● नेमके कोणत्या तालुक्यात किती ? ● सविस्तर अहवाल काही वेळातच
सातारा / प्रतिनिधी :
गतवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात जी स्थिती उद्भवली होती, त्याहीपेक्षा भयानक स्थिती जिल्हा कडक उन्हाळ्यात अनुभवत आहे. एप्रिल महिन्यात तर कोरोनाने कहर केला असून संपूर्ण जिल्ह्यातील स्थिती अवघड झाली आहे. शुक्रवारी रात्रीच्या अहवालात 2001 जणांचा अहवाल बाधित आल्याचा नवीन उच्चांकी आकडा समोर आला आणि सर्वांच्या काळजात धस्स झाले आहे. आता शनिवारी काय असा प्रश्न मनात घेऊन झोपलेल्या जिल्हावासीयांना रविवारी सकाळी आलेल्या 1933 जणांच्या बाधित अहवालाने धक्काच दिलेला आहे. नवीन उच्चांक प्रस्थापित करत सुरू असलेला कोरोनाचा कहर आणि कोरोना संसर्गाचे नवे रुप जिल्हावासीयांना भयावह करून टाकत आहे.
बेड, ऑक्सिजन साठी पळापळ सुरुच
जिल्ह्यात एकूण उपचार घेणाऱ्यांची संख्या सोळा हजारांच्या पार गेले असून त्यापैकी प्रत्यक्ष दवाखान्यात 3000 च्या वर रुग्ण उपचार घेत आहेत मात्र दुसरीकडे उच्चांकी बाधीत वाढ होत असल्याने आता जिल्ह्यात बीड मिळणे दुरापास्त झाले आहे बेड आणि ऑक्सिजन साठी बाधित आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची जीवघेणी धावपळ जिल्ह्यात सुरू आहे. प्रशासनाकडून सूचनांचा भडिमार सुरू आहे मात्र आरोग्य सुविधा देण्यात प्रशासन आता अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे लोकांनीच स्वतःची काळजी घेऊन हा लढा जिंकण्यासाठी सिद्ध व्हायला हवे असा संदेश परस्थिती देऊ लागली.
कडक लॉकडाऊनमध्ये होणारी वाढ अचंबित करणारी
जिल्ह्यात सध्या उन्हाळ्याने वातावरण पूर्णपणे होरपळून गेले आहे. तापमानाचा पारा 35 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ लागल्याने नागरिक हैराण झाले असून लॉकडाऊन मध्ये घरात बसून नियम पाळण्याची वेळ आलीय. दुसरीकडे दररोज नवनवीन उच्चांक प्रस्थापित करत कोरोना बाधितांची होणारी वाढ देखील अचंबित करणारी आहे. चर गेल्या काही दिवसापासून सुरू असलेले कोरोना बळींचे सत्रही कमी-जास्त संख्येने सुरुच असल्याने आभाळच फाटले अशी स्थिती दिसत आहे. मात्र तरीदेखील लढावे लागणारच आहे
रेमडेसिवीरची कमतरता आहेच
एकीकडे वाढती बाधितांची संख्या, रेमडेसिवीरची कमतरता, ऑक्सिजन, व्हेंटेलेटर बेड नसल्याच्या तक्रारी तर वाढत्या मृत्यूदराने गोंधळ वाढत आहे. रेमडिसीव्हर इंजेक्शनचा कशा पद्धतीने व्हावा यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला असला तरी अद्याप मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही. अनेक डॉक्टर्स इंजेक्शन लागतच नाही असे म्हणत असले तरी अनेक डॉक्टर हे इंजेक्शन रेफर करत आहेत. त्यामुळे नक्की काय हा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. तरीदेखील या स्थितीत गतवर्षी ज्या प्रमाणे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करुन कोरोनाविरुध्दची लढाई जिंकत आणली होती. त्याच निर्भयपणे काही दिवस तर पॅनिक न होता ज्यांना मदतीची आवश्यकता आहे ती करुन एकमेकांचे जगणे सुसहय़ करत ही लढाई लढावीच लागणार आहे. त्यामुळे सध्या जे बाधित नाहीत त्यांनी तरी लस घ्या, घरात बसून नियम पाळा व कोरोना टाळा.
शनिवारी रात्री आलेल्या अहवालात 1,933 जणांचा अहवाल बाधित आल्याचे प्रशासनाने म्हंटले असून आता कोणत्या तालुक्यात किती याचा सविस्तर अहवाल दुपारी सर्वांना कळेल. त्यानुसार आता कोरोना विरुद्धची लढाई कशी जिंकावी लागेल याची रणनीती प्रशासनासह नागरिकांना ठरवावी लागणार आहे.
शनिवारी बाधित….2,001मुक्त…..1,012 मृत्यू….34
शनिवारपर्यंत जिल्ह्यात बाधित…..91,687मृत्यू…..2,291मुक्त….73,282उपचारासाठी….16,083









