प्रतिनिधी / सातारा
विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभर 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबरपर्यंत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जनतेच्या सहभागातून ही मोहीम सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमार्फत प्रभावीपणे राबविण्यात यावी, याविषयीचे आदेश आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी जारी केले आहेत.
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याला अटकाव घालण्यासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत शहर, गाव, पाडे, वस्त्या, तांडे येथील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी, कोविड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकाला व्यक्तिश: भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिकांचे आयुक्त यांनी पूर्वतयारी करणे आवश्यक आहे.
मोहिमेचे उद्दिष्ट : राज्यामध्ये गृहभेटीद्वारे संशयीत कोविड तपासणी व उपचार.अति जोखीमचे व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोविड-19 प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण. सारी, आयएलआय रुग्णांचे गृहभेटीद्वारे सर्वेक्षण, कोविड तपासणी आणि उपचार. गृहभेटीद्वारे प्रत्येक नागरिकांचे कोविडबाबत आरोग्य शिक्षण असे आहे.
पथकाचे स्वरुप : पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी किंवा आशा आणि 2 स्थानी स्वयंसेवक (1 पुरुष व 1 स्त्री) असतील हे स्वयंसेवक स्थानीक सरपंच, नगरसेवक यांनी निश्चित करावयाचे आहेत. पथकातील सदस्यांना कोरोना दूत असे संबोधण्यात यावे. सरपंच, नगरसेवक यांच्याकडून स्वयंसेवक प्राप्त न झाल्यास त्या ऐवजी 1 आरोग्य कर्मचारी, आशा देण्यात यावी. अशा वेळी पथकात 2 आरोग्य कर्मचारी, आशा असतील महानगर पालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामीण भाग यामध्ये पुढील पैकी आरोग्य कर्मचारी सर्वेक्षणासाठी घेण्यात यावेत. बहुविध आरोग्य सेविका (स्त्री) (ए.एन.एम.), बहुविध आरोग्य सेवक (पुरुष) (आरोग्य सेवक), आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती (आवश्यकतेनुसार महिला व बाल कल्याण विभागांची परवानगी घेऊन). किमान 10 वी पास कोविड दुत (स्वयंसेवक) प्रत्येक पथकात 1 पुरुष व 1 स्त्री. इतर कर्मचारी (उपरोक्त मधून पुरेसे कर्मचारी उपलब्ध झाले नाही तर) प्रत्येक 5 ते 10 पथकामागे 1 डॉक्टर (वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र) प्राथमिक आरोग्य पथक किंवा समुदाय आरोग्य अधिकारी.
पथकातील सदस्यांना पुढीलप्रमाणे साहित्य सर्वेक्षण वेळी पुरविण्यात येणार : इन्फ्रारेड थर्मामिटर, पल्स ऑक्सीमीटर, स्टिकर, मार्कर पेन, टी शर्ट, कॅप, बॅड, बॅच उपलब्धतेनुसार. नोंदणीसाठी ॲप डाऊनलोड, अर्ज, तीन लेअर मास्क व सॅनिटायझर.
मोहिम काळात पथकाने घ्यावयाची काळजी : पथक सदस्याला सर्वेक्षण करताना घरच्या व्यक्तींकडून सर्वेक्षण पथक सदस्यांची आणि सदस्यांचे घरातील व्यक्तींना संसर्ग होऊ नये यासाठी पुढील उपाययोजना कराव्यात. सर्वेक्षण मोहिमे दरम्यान सतत मास्क परिधान करुन रहावे. दोन घरांच्या भेटी दरम्यान हात साबणाने धुवावेत किंवा सॅनिटायझर ने निर्जतुक करावेत. शक्यतो मोकळ्या हवेशीर जागेमध्ये माहिती भरावी.
गृहभेटी पहिली फेरी : प्रत्येक घरात शिरण्यापुर्वी दाराबाहेर सोयीच्या ठिकाणी स्टीकर लावण्यात यावेत. घरामध्ये गेल्यानंतर प्रत्येक सदस्याची ॲपमध्ये नोंद करण्यात यावी आणि त्यानंतर इन्फ्रारेड थर्मामिटर ने तापमान व पल्स ऑक्सीमीटर Spo2 मोजण्यात यावेत व ते नोंदविण्यात यावे. ताप असलेली व्यक्ती आढळल्यास तापमान (96.6 F) अशा व्यक्तीस खोकला, घशात दुखणे, थकवा इत्यादी लक्षणे आहेत का याची माहिती घ्यावी. घरातील प्रत्येकास मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनी आजार, अवयव प्रत्यारोपण, दमा इत्यादी आजार आहेत का याबाबत विचारणा करावी आणि दिलेल्या उत्तरानुसार ॲपमध्ये माहिती भरण्यात येणार आहे.
माहिती भरल्यानंतर ताप 100.4 अंश फॅरनहाईट (38 C) इतका किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास किंवा 95 टक्के कमी असल्यास रुग्णांस जवळच्या हॉस्पीटलमध्ये संदर्भीत करावे. संदर्भीत करताना रुगणास संदर्भ चिठ्ठी देण्यात यावी तसेच कोविड-19 प्रतिबंधाचे सर्व संदेश रुग्ण व घरातील सर्व नातेवाईकांना द्यावेत. घरातील कोणत्याही व्यक्तीस मधुमेह, उच्चरक्तदाब, किडनी आजर, लठ्ठपणा, दमा किंवा इतर मोठे आजार असल्यास त्याची तपासणी करुन खात्री करावी. अशा रुग्णांचे तपमान 97.7 फॅ. (37 C) पैक्षा जास्त असेल आणि 100.4 फॅ. पेक्षा कमी असेल तरी सुद्धा उपचार केंद्रात संदर्भीत करावे.
गृह भेटी दुसरी फेरी : कुटुंबातील सदस्यांची माहिती पहिल्या फेरीत घेतलेली असल्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये दररोज 75-100 घरे करावीत. दुसऱ्या फेरीमध्ये सर्वाचे तापमान व Spo2 मोजावे. दरम्यानच्या काळात घरातील कोणाला मोठा आजार होऊन गेला का याची खात्री करावी. पुन्हा एकवेळा आरोग्य संदेश द्यावा. ताप 100.4 फॅरनहरिट (38 C) पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास आणि हे 94 टक्के पेक्षा कमी असल्यास रुग्णास संदर्भीत करावे. पहिल्या फेरीच्या वेळी गैरहजर असणाऱ्या घरातील व्यक्तीची साठी चौकशी करावी.
मोहिमेदरम्यान द्यावयाचे संदेश : सतत मास्क घालून रहावे. मास्क शिवाय घराबाहेर पडू नये. दर 2-3 तासांनी साबणाने स्वच्छ हात धुवावेत. हात धुण्याची सोय नसलेल्या ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करावा. नाक, तोंड, डोळे यांना हात लावू नये. ताप आल्यास तसेच सर्दी, खोकला, घसा दुखणे, धाप लागणे, खुप थकवा येणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरीत जवळच्या क्लिीनीकमध्ये जावून तपासणी करुन घ्यावी. मधुमेह,ह्दयविकार, किडीन आजार, लठ्ठपणा असल्यास दररोज तापमान मोजावे व तापमान 98.7 फॅ. (37 C) पेक्षा जास्त आढळल्यास क्लिनीकमध्ये तपासणी करावी. सध्या सुरु असलेल्या आजारामधील उपचार सुरु ठेवावेत तयास खंड पडू देवू नये, डॉक्टरांकडून नियमित तपासणी करुन घ्यावी. कोविडमुळे होणारी गुंतागुंत व मृत्यु टाळण्यासाठी ताप, खोकला, दम लागणे इत्यादी लक्षणे आढळल्यास त्वरीत कोवीड चाचणी केंद्रात जाऊन चाचणी करावी व डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार करावेत.
10 व 7 दिवसाचे होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या व्यक्तींसाठी पुढील संदेश द्यावे : सतत मास्क लावावा. खोलीच्या, घराबाहेर पडू नये. दर 2 तासांनी स्वच्छ हात धुवावेत. स्वतंत्र टॉयलेट, बाथरुम , जेवणांची भांडी वापरावीत. कपडे स्वतंत्रपणे धुवावेत. ताप आल्यास, थकवा जाणवू लागल्यास त्वरीत रुग्णालयात जावे.
मार्गदर्शक सूचना
• मोहीम कालावधीमध्ये गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार करणे. पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी दिलेले दोन स्थानिक स्वयंसेवक असतील.
• एक पथक दररोज ५० घरांना भेटी देईल. भेटीदरम्यान घरातील सर्व सदस्यांचे तापमान तपासणे, कोमॉर्बिड आहे का याची माहिती घेतील.
• ताप, खोकला, दम लागणे, एसपीओ२ कमी अशी कोविडसदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या फेव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करावे. तिथे तपासणी करून उपचार करण्यात येईल.
• कोमॉर्बिड रूग्ण नियमित उपचार घेतात का याची खात्री करावी.
• प्रत्येक ५ ते १० पथकामागे एक डॉक्टर उपचार व संदर्भ सेवा देतील.
प्रशासनाने पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
• लोकसंख्येनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र, शहर, गाव येथे आरोग्य पथके तयार करून त्यांना प्रशिक्षण देऊन साहित्य वाटप करावे.
• कोमॉर्बिड रूग्णासाठी औषधांचा साठा रूग्णालय स्तरावर उपलब्ध करून द्यावा.
• प्रत्येक तालुक्यात एक ताप उपचार केंद्र कार्यरत करणे आवश्यक आहे.
• आवश्यकतेनुसार कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची निर्मिती करावी.
• ऑक्सिजन पुरवठा सुरळित करणे.
• कोविड रूग्णांसाठी दोन-तीन प्रा. आ. केंद्रानुसार एका ॲम्ब्युलन्सची सोय करावी.
• लोकप्रतिनिधी, खाजगी दवाखाने, स्वयंसेविका यांचा मोहिमेसाठी सहभाग करून घ्यावा
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









