खवले मांजर, तीन दुचाकी असा 1 लाख10 हजारांचा ऐवज हस्तगत
ग्राहक बनून तस्करांना पकडले जाळ्यात
प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात वन्य प्राण्यांची तस्करी होत आहे. तशी माहिती वनविभागाच्या भरारी पथकास मिळाली होती. वनविभागाचे वेळे( ता. वाई ) येथील हॊटेल शिवकैलासच्या समोर शनिवारी दुपारी सापळा रचुन खवले मांजर विक्री करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून खवले मांजर, तीन दुचाकी, मोबाईल असा 1 लाख10हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांमध्ये सातारचे दोघे आणि पुण्यातील दोघांचा समावेश आहे.या कारवाईने खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वनविभागाच्या भरारी पथकास सातारा जिल्ह्यात खवले मांजराची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. हे मांजर विक्री करण्यासाठी तस्करी होत आहे. त्या तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी वनविभागाच्या पथकाने पोलिसांच्या प्रमाणे टॅक्ट वापरली. अगोदर जाळे टाकून त्या तस्करांना खवले मांजर हवे आहे असे सांगून त्यांना वेळे येथील हॉटेल शिवकैलास येथे बोलावले. दि. 29 रोजी हॉटेलवर मांजराची किंमत देण्यासाठी बोलावले आणि ते आकाश चंद्रकांत धडस (वय १९ वर्षे, रा. पाडळी ता. खंडाळा), लक्ष्मण विश्वास धायगुडे (वय २४ वर्षे, रा. पाडळी ता. खंडाळा), मेहबूब चांदबा विजापूरकर (वय २२ वर्षे, रा. रामनगर, वारजे, पुणे), निखिल युवराज खांडेकर( वय २३ वर्षे, रा. रामनगर, वारजे, पुणे) हे चौघे जण दुचाकीवरून तरटाच्या पोत्यातून खवले मांजर घेऊन आले. त्यांना वनविभागाच्या जाळ्यात सापडल्याचे लक्षात आल्यावर स्वाधीन केले.
वनविभागाने त्यांच्याकडून खवल्या मांजरासह 3 दुचाकी, 6 मोबाईल असा 1 लाख दहा हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी, संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन सातारा सचिन डोंबाळे वनपाल गजानन भोसले, वनरक्षक दीपक गायकवाड, विजय भोसले, पोलीस हवालदार राजेश वीरकर, सुहास पवार चालक दिनेश नेहरकर यांनी पार पाडली. या कारवाईमध्ये वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे (WCCB) चे रोहन भाटे यांनी देखील महत्वाचा सहभाग घेतला.
खवले मांजर हा वन्यप्राणी निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्वाचा घटक असल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियममध्ये याला अनुसुचि १ मध्ये स्थान देऊन व्यापक संरक्षण दिलेले आहे. समाजातील अपप्रवृत्तीमुळे या वन्यप्राण्यांचे अस्तित्वाला पर्यायाने निसर्गाच्या अन्नसाखळीला
धोका निर्माण झाला आहे. खवले मांजर व इतर वन्यप्राण्याबाबत समाजामध्ये अनेक गैरसमजुती आहेत. त्यातुनच सामान्य लोकांकडुन खवले मांजराचे मांसासाठी तसेच जादूटोणा सारख्या अंधश्रद्धेसाठी पकडणेत येते परंतु वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अन्वये वन्यप्राणी पकडणे,बंदिवासात ठेवणे, विक्री करणे, शिकार करणे, वाहतूक करणे हा गुन्हा असून त्यासाठी ३ वर्षे ते ७ वर्षापर्यंत कैद व रुपये दहा हजार रुपयेपर्यंत दंडाची तरतुद आहे. तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की, मांसाच्या लोभापायी अशा गंभीर गुन्हयामध्ये कोणत्याही प्रकारे सहभागी होऊ नये व अशा प्रकारे कोणत्याही वन्यप्राण्याची शिकारीबाबत कोणतीही माहिती असल्यास वनविभागाचे स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधुन अथवा १९२६ या वनविभागाचे टोल फ्रि क्रमांकावर संपर्क करुन त्याबाबतची माहिती दयावी, असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.