सातारा / प्रतिनिधी :
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ फासण्याचे काम पालिकेतील एक कर्मचारी करत आहे. अगदी अध्यक्षांच्या केबीनलगतच असलेल्या खिडकीचा वापर पिंकदानी म्हणून केला जात आहे. उपाध्यक्षसाहेब तेवढं त्यांच्याकडं ही बघा. जरा ह्या कर्मचाऱ्यांचा गुटखा खावून थुंकण्याचा उपक्रमही पालिकेच्या सीसीटीव्हीत कैद होतो आहे. पण, ह्यांना नेमका गुटखा मिळतो कोठून, ह्याच्यावर कारवाई होणार का?, असे सामाजिक कार्यकर्तेच प्रश्न विचारु लागले आहेत.
सातारा जिह्यातील शासकीय कार्यालये धुम्रपान मुक्त करण्याचा निर्धार जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केला होता. त्यानंतर कोरोना आला अन् सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, अन्यथा दंड असा आदेशही त्यांनी काढला आहे. मात्र, याच आदेशाला सातारा पालिकेत हरताळ फासण्याचे काम होत आहे. सातारा पालिकेतील एका कर्मचाऱ्यास थेट जलमंदिर पॅलेसवरुन आर्शिवाद असल्याने चांगल्या ठिकाणी कार्यभार दिला आहे. पण एखाद्यास संधी दिली तर निष्ठेने काम करावे, परंतु यांचे मात्र उलटेच चित्र सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येत आहे. संपूर्ण सातारा शहरात गुटखा बंदी आहे. ह्या कर्मचाऱ्यास नेमका गुटखा मिळतो कोठून, आणि गुटख्याने तोबरा भरुन सभागृहाकडे जाणाऱया रस्त्याच्या बाजूलाच भिंतीत एक खिडकी आहे. त्या खिडकीत पिंकदानी केलेली आहे. शहर विकास विभागाच्यासमोर अशीच खिडकी आहे. तेथेही पूर्वी एक कर्मचारी असाच पिंकदानी करायचा. आता जसा हा कर्मचारी पालिकेची रया घालवत आहे. त्याच्यावर उपाध्यक्ष मनोज शेंडे हे नेमकी काय कारवाई करणार अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून नाव न छापण्याच्या अटीवर करण्यात आली आहे.
पालिकेचा काखेत कळसा गावाला वळसा
सातारा पालिकेत काही कर्मचारी हे अतिशय चांगले काम करतात परंतु काही कर्मचारी ज्या चुका करतात. त्यांच्यामुळे पालिकेने केलेल्या चांगल्या काम पथ्यावर पडते आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषगंगाच्या वसुधरेची शपथ घेणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून थुंकण्याचा उपक्रम कशासाठी राबवण्यात येतो. ड्युटीवर असताना गुटखा खाणारे या कर्मचाऱ्यांवर दंड करा, किंवा त्यांची अन्यत्र बदली करा, अशी मागणी त्या सामाजिक कार्यकर्त्याकडून होत आहे.









