पालिकेच्यावतीने यंत्रणा सज्ज
सायंकाळी उशिरा 50 मंडळांनी विसर्जन करण्याची शक्यता
बुधवार नाका कृत्रिम तळ्याच्या ठिकाणी क्रेन तयार
प्रत्येक तळ्याच्या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी तैनात
प्रतिनिधी / सातारा
उद्या मुख्य गणेश विसर्जनाचा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात सार्वजनिक आणि घरगुती गणेश विसर्जनासाठी पालिकेकडून नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी कोरोनामुळे मोठा थाटमाट नसला तरी पालिकेने कृत्रिम तळ्याच्या ठिकाणी सोय केली आहे. बुधवार नाका येथील पाण्याच्या टाकीजवळ मोठी क्रेन आणण्यात आली आहे.सातारा पालिकेचे दीडशे कर्मचारी विसर्जनासाठी नियुक्त केले आहेत. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत 50 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अगदी साधेपणाने मिरवणूक न काढता बाप्पांचे विसर्जन करण्यात आहेत. उद्या विसर्जनाचा मुख्य दिवस असल्याने सातारा पालिका, पोलीस यांनी विसर्जन ठिकाणी तयारी केली आहे.
गणेश विसर्जनाचा मुख्य दिवस दि.1रोजी आहे. दरवर्षी प्रमाणे काही मंडळे आदल्या दिवशी विसर्जन करतात.त्यानुसार सातारा पालिकेकडे नोंदणी झालेल्या सुमारे 250 मंडळापैकी 50 मंडळांनी मिरवणूक न काढता अतिशय साध्या पध्दतीने सोमवारी विसर्जन करणार आहे.
पालिकेने पुढील 12 ठिकाणी सोय केलेली आहे
भवानी पेठेतला पोहण्याचा तलाव, रविवार पेठेतील हुतात्मा स्मारक येथील तळे, सदरबाजार येथील दगडी शाळेतील तळे, गोडोलीत आयुर्वेदिक गार्डनच्या बाजूला असलेले तळे, फुटक्या तळ्याजवळ 6 टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. मंगळवार तळे येथे 6 टाक्या ठेवल्या आहेत. न्यु इंग्लिश चौकातल्या हौदाजवळ टाकी, गोखले हौदाजवळ टाकी, पंतांच्या गोटात गुरवे ग्लास जवळ एक टाकी, रामाच्या गोटात मंदिराच्या परिसरात 3 टाक्या, विश्वेश्वर मंदिराजवळ दोन टाक्या, सदर बाजार येथील करिआप्पा चौकात दोन टाक्या ठेवण्यात आल्या आहे.मुख्य विसर्जन ठिकाणी सातारा पालिकेची मोठी क्रेन बोलावली असून लाईफ जॅकेट परिधान करून कर्मचारी तैनात केले आहेत.शासनाने दिलेल्या आदेशानुसार गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. दुपारपासून सायंकाळी उशिरापर्यंत शहरातील काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय साधेपणापणे विसर्जन करण्यात आले आहे.









