संपूर्ण कामकाज होणार ऑनलाईन आरोग्य खात्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
प्रतिनिधी / सातारा
कोरोनाचा कहर सुरू असताना आशा स्वयंसेविका, आणि गटप्रवर्तक या फिल्डवर जावून काम करत आहेत. त्यांना 72 आरोग्यविषयक कामे करावी लागत आहेत. या कामाचा अहवाल त्यांना दर महिन्याला द्यावा लागतो. त्यांची दखल घेत आरोग्य विभागाने आता त्यांचे सर्व कामकाज ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे.
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांचे कोरोनामुळे काम आणखीच वाढले आहे. लॉकडाऊन लागू झाल्यापासून घरोघरी जावून सर्व्हे करणे, कोरोना संशयितांची माहिती जमा करणे, त्यांना उपचारासाठी पाठविणे, अशी दैनंदिन कामे करून कोरोनाचीही कामे करावी लागत आहेत. जिह्यात 2 हजार 500 आशा स्वयंसेविका, आणि 130 गटप्रवर्तक आहेत. सर्व्हेत कोणत्याही सोयी-सुविधा पुरवण्यात येत नसताना हा सर्व्हे करून अहवाल पाठवावा लागत आहे.
याच पार्श्वभूमीवर सद्य: स्थितीत आरोग्य विभागानेकाही सॉफ्टवेअर सुरू केली आहेत. ती तातडीने भरणे आवश्यक बनले आहे. त्याद्वारे वरिष्ठांना माहिती मिळून तत्काळ पुढील कार्यवाही करणे शक्य होत आहे. त्यांचा विचार करून आरोग्य विभागाने आता त्यांचे कामकाज ऑनलाईन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांना सुमारे आठ हजार रूपयांपर्यंतचा मोबाईल देण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतीच आरोग्य विभागाने 36 कोटी 62 लाख 64 हजार रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.









