सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील 878 ग्रामपंचायतीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने इच्छूक उमेदवारांनी तहसील कार्यालयात गर्दी केली होती. सरपंच व ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी इच्छूक असलेल्यांनी आपली कागदपत्रे घेवून कार्यालयात हजेरी लावली होती. काही गावात इच्छूकांना बिनविरोध करण्यासाठी गावचे नेते समजूत घातल होते. काही ठिकाणी दमबाजीचे प्रकार होत असल्याने वादावादी नको म्हणून अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 7 हजार 265 सदस्यांसाठी जिह्यातून सुमारे 10 हजार इच्छूकांनी अर्ज दाखल केले आहेत. आता अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणूकीने जिल्ह्यात राजकारण ढवळून निघाले आहे. निवडणूक लागलेल्या गावात मला बी सरपंच व्हायचं आहे म्हणून जो तो गुडघ्याला बाशिंग बांधून नाचू लागला आहे. तर गावचे नेते आपल्या गावात आपलाच सरपंच कसा होईल, यासाठी गावगुंड्या करताना दिसत आहेत. आपल्याच गल्लीतला आपल्याच विचारांचा सरपंच आणण्यासाठी त्यांच्याकडून खेळ्या सुरु झालेल्या आहेत. काही ठिकाणी मग बिनविरोधचा फंडा तर काही ठिकाणी दबावाचा फंडा सुरु झालेला आहे. जिल्ह्यात आज अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने सकाळपासून गावापासून ते तहसील कार्यालयापर्यंत उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी अक्षरशः उड्या घेतल्या होत्या. वादावादीचे प्रसंग होवू नयेत म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आज दिवसभर दाखल झालेल्या अर्जाची माहिती गोळा करण्याचे कामकाज रात्री उशीरापर्यत निवडणूक विभागात सुरु होते. परंतु काल रात्री उशीरापर्यत आलेल्या आकडेवारीनुसार सातारा तालुक्यातून 130 ग्रामपंचायतीसाठी 1हजार 46 सदस्यांसाठी 940 अर्ज, कराड तालुक्यातून 104 ग्रामपंचायतीसाठी 1 हजार 24 सदस्यांसाठी 1895 अर्ज, पाटण तालुक्यातून 107 ग्रामपंचायतींसाठी 809 सदस्यांसाठी 754 अर्ज दाखल, कोरेगाव तालुक्यातून 56 ग्रामपंचायतीसाठी 468 सदस्यांसाठी 712 अर्ज दाखल, वाई तालुक्यातून 76 ग्रामपंचायतींसाठी 606 सदस्यांसाठी 589 अर्ज दाखल, खंडाळा तालुक्यात 57 ग्रामपंचायतीसाठी 461 सदस्यांसाठी 664 अर्ज दाखल, महाबळेश्वर तालुक्यातून 42 ग्रामपंचायतीसाठी 296 सदस्यांसाठी 178 अर्ज दाखल, फलटण तालुक्यातून 80 ग्रामपंचायतीसाठी 712 सदस्यांसाठी 918 अर्ज दाखल, जावली तालुक्यात 75 ग्रामपंचायतीसाठी545 सदस्यांसाठी 374 अर्ज दाखल, माण तालुक्यात 61 ग्रामपंचायतीसाठी 529 सदस्यांसाठी 386 अर्ज दाखल, खटाव तालुक्यात 90 ग्रामपंचायतीसाठी 768 सदस्यांसाठी 921 अर्ज दाखल झाले होते. आज दिवसभरात सकाळपासून रिघ होती. अगदी अर्ज दाखल करण्याच्या टेबलापर्यंत गर्दी दिसत होती. दाखल झालेल्या अर्जाची माहिती जुळवण्याचे कामात यंत्रणा रात्री उशीरापर्यंत व्यस्त होती.









