कराड / प्रतिनिधी
कराड शहरातील नाकाबंदी व बंदोबस्ताची पाहणी शनिवारी अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी केली. त्यांच्यासमवेत उपअधिक्षक रणजीत पाटील, वपोनि बी. आर. पाटील, पो. नि. बाळासाहेब भरणे उपस्थित होते. दरम्यान, कोल्हापूर नाका येथे स्वच्छता करणाऱ्या पालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांशी अप्पर पोलीस अधिक्षक पाटील यांनी संवाद साधत त्यांच्या स्वच्छतेच्या कामाचे कौतुक केले.
कराड शहरातील कोरोना साखळी तोडण्यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. पोलिसांकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु आहे. शहरात प्रवेश होणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून अंतर्गंत मार्गावर बॅरिकेटस उभा करण्यात आली आहेत. विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. पोलिसांकडून सुरु असलेल्या या कामाची पाहणी शनिवारी अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी केली.
यावेळी त्यांनी कोल्हापूर नाका येथे नाकाबंदीचे नियंत्रण करत असलेले अधिकारी सपोनि विजय गोडसे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर तेथे स्वच्छता करणाऱ्या पालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या कामाचे कौतुक करत कोरोनाच्या संकटात काळजी घेण्याचा सल्ला अप्पर अधिक्षक पाटील यांनी त्यांना दिला. त्यांच्यासमवेत उपअधिक्षक रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे आदी अधिकारी उपस्थित होते.









