सातारा / प्रतिनिधी
दरवर्षी बुद्ध जयंतीचा सोहळा सातारा शहरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाची रेलचेल असते. मात्र, यावर्षी कोरोना महामारीचे संकट आल्याने अगदी घरात राहून बौद्ध जयंती साजरी करण्यात आली. सातारचे तरुण चित्रकार सागर गायकवाड यांनी घरातच गौतम बुद्धांचे चित्र काढून अनोखी बुद्ध जयंती साजरी केली.
चित्रकार सागर गायकवाड यांनी आजपर्यंत अनेक चित्र साकारली आहेत.गौतम बुद्ध जयंतीनिमित्त त्यांनी बुद्धांचे चित्र साकारत जयंती साजरी केली. त्या चित्राबाबत सागर गायकवाड म्हणाले, बुद्धाचं माणुसपण मला जवळचं वाटतं. त्यांनी आपल्याला अंतकरणात पहायला शिकवलं.स्वतःचा शोध घ्यायला लावलं.दुःखाची कारणमीमांसा करून सुखाच्या शोधाची वाट दर्शवली. बुद्ध आपल्या आयुष्यात आनंदाची उधळण करतात.त्यांनी आपल्याला अंधविश्वासापासुन दूर करून शुभ्र प्रकाशमय वाट दाखवली आहे. अत्त दिप भवं .”स्वयं प्रकाशीत व्हा.” कोणीही सांगितलेली गोष्ट जशीच्या तशी न स्वीकारता ती ज्ञानाच्या विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहायला लावली. कोणीही बुद्धत्व प्राप्त करू शकते ही आंतरिक उर्मी त्यांनी चेतवली आहे. बुद्धांनी मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी आपलं सार आयुष्य पणाला लावले. आहेत. त्यांनी मानवी जीवन सुंदर केले.
बुद्ध चित्र काढताना मी त्यांच्या शिर्षा मागील तेजोवलय काढत नाही. ते स्व:ताला प्रेषित नव्हे मनुष्य समजतात. त्यांचं चित्र चितारताना प्रतिकात्मक बोधी वृक्षांची पानं हे ज्ञानाचं प्रतिक म्हणुन व सौंदर्याचे प्रतिक फुलांची रचना केलीय. त्यांच्या ज्ञानाची निळाई तुन त्याची प्रतिमा उमटते आहे. त्यागाचं प्रतिक भगवपण त्यांच्या आस्तिवावर विखुरलेलं आहे. बुद्धाची ही चिंतऩशिल भावमुद्रा आहे. हे चित्र अॅक्रेलिक कलर्स, कॅनवासवर काढले आहे.








