प्रतिनिधी / सातारा
सातव्या आर्थिक गणनेचे जिल्हास्तरीय समितीच्या नियंत्रणाखाली सातव्या आर्थिक गणनेचे काम 1 डिसेंबर 2020 पासून नगरपालिका क्षेत्रात सुरु झालेले आहे. सातव्या आर्थिक गणनेद्वारे गाळा करण्यात येणारी माहिती ही गोपनीय राहणार आहे. सातव्या आर्थिक गणनेच्या राष्ट्रीय कामासाठी आपणाकडे येणाऱ्या गणनेच्या प्रगणकास खरी व वस्तुनिष्ठ माहिती देवून नगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार राज्यात सातवी आर्थिक गणना सन 2019-20 मध्ये घेण्यात येणार आहे. आर्थिक गणनेद्वारे उपलब्ध होणारी माहिती राष्ट्रीय उत्पन्न किंवा राज्य उत्पन्न यांचे अंदाज अधिक अचूकपणा तयार करण्यासाठी उपयुक्त होणार आहे. तद्वतच सदर माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावर प्रशासकीय व्यवस्थापन तसेच नियोजनासाठी उपयोगी पडणार आहे. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांच्या सहभागाची आकडेवारी प्राप्त करण्याच्या दृष्टीने घेण्यात येणाऱ्या पश्चात सर्वेक्षणाची फ्रेम तयार करण्यासाठी ही केला जातो. विशेषत: अनोंदणीकृत / असंघटीत उद्योगातील रोजगार विषयक आकडेवारीचा हा एकमेव स्त्रोत आहे. या बाबी विचारात घेवून राष्ट्रव्यापी सातव्या आर्थिक गणनेचे क्षेत्रीय काम गुणवत्तापुर्वक होणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील सर्व जणगणना गावे, जनगणना शहरे व नगरपालिका यांतील जनगणना 2011 च्या चार्ज रजिस्टरमधील सर्व प्रगणन गटांमध्ये समाविष्ट कुटुंबे व उद्योग यांची गणना केली जाणार आहे. या गणनेमध्ये हंगामी व बारामाही पिके, शासकीय कार्यालये, आंतरराष्ट्रीय संस्था, न्यायालये, कर कार्यालय, संरक्षण मंत्रालय, पोलिस, भ.नि.नि. कार्यालय, आंतरराष्ट्रीय संस्था-राष्ट्रसंघ, परदेशी वकीलाती, सरकारने अनाधिकृत घोषित केलेल्या आस्थापना-जुगार, पैजा इ. सोडून उर्वरित सर्व आर्थिक कार्याची माहिती गोळा केली जाणार आहे. तसेच शासकीय शाळा, संस्था, कॉलेज, रुग्णालये, वसतीगृह, सदनिका, विश्रामगृह, अतिथीगृह, राष्ट्रीयकृत बँका, सर्व सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांचा गणनेत समावेश केला जाणार आहे. यावेळी सातव्या आर्थिक गणनेच्या राष्ट्रीय कामासाठी आपणाकडे येणाऱ्या गणनेच्या प्रगणकास खरी व वस्तुनिष्ठ माहिती देवून नगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.