सातारा / प्रतिनिधी
ढेबेवाडी विभागातील एका गावातील सातवर्षीय चिमुरडीचा मृतदेह कालरात्री गावातीलच एका ओघळीत आढळून आला. अत्याचार करून तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून याप्रकरणी संतोष चंद्रु थोरात (रा.ता.पाटण ) या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबतची माहिती अशी,संबधित सात वर्षीय बालिका दुसरीच्या वर्गात शिकते. काल दुपारी साडेतीनच्या सुमारास ती बाहेर खेळायला गेली मात्र उशिरापर्यंत घराकडे परतली नाही. गिरणीतून दळण घेवून घराकडे आलेल्या आजीच्या लक्षात हा प्रकार आल्यावर शोधाशोध करण्यात आली मात्र ठावठिकाणा न लागल्याने पोलिसांना कळविण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून कसून तपास सुरू केला. एकावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता या प्रकरणाचा उलगडा झाला. संतोष चंद्रु थोरात असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिस त्या मुलीच्या मृतदेहापर्यंत पोहचले. संशयिताने बलात्कार करून तिचा गळा आवळून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील यांनी भेट देवून तपासकामी पोलिसांना सुचना दिल्या. कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.









