कोल्हापूर / संजीव खाडे
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे ठप्प झालेले व्यवहार आणि वीजदरात झालेली वाढ यामुळे मार्च, एप्रिल आणि मे या काळातील वीजबिले भरण्याकडे जिल्हय़ातील वीजग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. महावितरणकडे 10 ते 30 जून या वीस दिवसांत एकूण 11 लाख 29 हजार 505 वीज ग्राहकांपैकी म्हणजेच केवळ 1 लाख 43 हजार 91 वीज ग्राहकांनी (12.66 टक्के) वीज बिल भरले आहे. म्हणजेच 9 लाख 86 हजार 414 वीज ग्राहकांनी वीज बिल भरण्याकडे पाठ फिरवल्याचे महावितरणची आकडेवारीवरून स्पष्ट होते. लॉकडाऊनच्या काळात अखंडीत वीज पुरवत सेवा देणाऱया महावितरणाला कोरोनासह वीजदरातील वाढीचा फटका सहन करावा लागत आहे.
22 मार्चला जनता कर्फ्युनंतर लॉकडाऊन सुरू झाला. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात सर्व व्यवहार ठप्प होते. या काळात महावितरणचे अखंडीत वीजसेवा दिली. मात्र कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मीटर रिडिंग टाळले. जूनमध्ये तीन महिन्यांची जी बिले ग्राहकांना पाठविण्यात आली. ती डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या गततीन महिन्यांतील वीज वापराच्या सरासरीवर काढण्यात आली होती. पण प्रत्यक्षात उन्हाळय़ात सर्व जण घरी असल्याने वीजेचा वापर वाढला होता. वाढीव रकमेची जी बिले आली आहेत, त्यामागे बिले चुकीची नाहीत तर वीजदरवाढीमुळे बिलातील रक्कम वाढल्याचे वीजविषयक तज्ञ प्रताप होगाडे (इचलकरंजी) सांगतात.
वीजदरवाढीमुळे मोठय़ा रकमेची बिले
वीजदरवाढीविषयी प्रताप होगाडे सांगतात, राज्यातील वीजग्राहकांकडून जून महिन्यात मीटर रिडिंग घेऊन जे तीन महिन्यांचे एकत्रित बिल आले आहे, त्याबद्दल वीजग्राहकांत प्रचंड संभ्रम, असंतोष आणि नाराजी आहे. नाराजी योग्य असली तरी खरी कारणे शोधण्याची गरज आहे. एप्रिल, मे महिन्यात जी बिले दिली गेली ती हिवाळय़ातील महिन्यांतील वीज वापराच्या सरासरीवर आधारीत होती. त्यामुळे आपल्या वाढ कळली नाही. आता आलेले बील मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांचे आहे. या तीन महिन्यात उन्हाळा होता, सर्वजण घरी असल्याने वीजेचा वापर वाढला होता. ही बाब जरी नैसर्गिक आहे. सर्वांत महत्वाचे कारण दरवाढीचे आहे. राज्यात 1 एप्रिल 2020 पासून वीजेची दरवाढ लागू झाली आहे. या दरवाढीचा प्रचंड परिणाम या बिलांवर झाला आहे.
अशी झाली वीजदरवाढ
22 मार्चला लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर राज्य विद्युत नियामक आयोगाने दरवाढीचा निर्णय दिला. 1 एप्रिल पासून दरवाढ लागू झाली. यामुळे घरगुती वीजग्राहकांची बिल रक्कम 5 ते 15 टक्के येईल, असा महावितरणचा दावा होता. पण प्रत्यक्षात 6.07 टक्के दरवाढ झाली असल्याचे अभ्यासानंतर स्पष्ट होत असल्याचे प्रताप होगाडे यांनी सांगितले. स्थिर आकार, वहन आकार आणि वीज आकार यातील वाढीमुळे वीजबिलात वाढ झाली आहे. दरवाढीनुसार पूर्वीचा फिक्स चार्ज 90 रूपयांऐवजी 100 रूपये झाला. वहन आकार 1 रूपया 28 पैशांऐवजी 1 रूपये 45 पैसे झाला. वीज आकार पहिल्या 100 युनिटसाठी पूर्वी 3 रूपये 05 पैसे होता. तो आता 3 रूपये 46 पैसे झाला. 100 ते 300 युनिटपर्यंत वीजआकार 6 रूपये 95 पैशांऐवजी 7 रूपये 43 पैसे एवढा वाढला. याचा एकत्रित परिणाम बिलांवर झाला आहे. पहिली शंभर युनिट वीज वापरणाऱया ग्राहकांच्या बिलात सरासरी 16 टक्के तर 100 ते 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱया ग्राहकांच्या बिलात सरासरी 13 टक्के वाढ झाली. त्यामुळे बिले वाढून आली आहे. बिलांविषयी तक्रार असल्यास महावितरणच्या लिंकवर जाऊन किंवा प्रत्यक्षात कार्यालयात जावून तपासून घ्या, दुरूस्त करून घ्या. मात्र वीजदरवाढीविरोधात ग्राहकांनी आपला असंतोष व्यक्त केला पाहिजे, असे होगाडे यांनी सांगितले.
महावितरणच्या वसुलीवर परिणाम
कोल्हापूर जिल्हय़ात महावितरणचे कोल्हापूर शहर, कोल्हापूर ग्रामीण 1, कोल्हापूर ग्रामीण 2, जयसिंगपूर, इचलकरंजी, गडहिंग्लज असे सहा विभाग आहेत. या सहा विभागातील वीज भरणा केंद्र आणि ऑनलाईनवरून 1 लाख 43 हजार 91 ग्राहकांनी 10 ते 30 जून या काळात वीज बिल भरले. एकूण 11 लाख 29 हजार 505 वीज ग्राहकांच्या संख्येच्या तुलनेत वीज बिल भरलेल्यांचे प्रमाण सरासरी 12.66 इतके होते. म्हणजेच 9 लाख 86 हजार 414 वीज ग्राहकांनी वीज बिल भरण्याकडे पाठ फिरवली आहे. नजिकच्या काळात महावितरणला वीजदरवाढीविषयी खुलासा करत बिलांची वसुली करावी लागणार आहे.