अपुऱया साधन सामुग्रीनिशी लढवला जातोय किल्ला : आठ पॉझिटिव्हपैकी चार कोरोनामुक्तही : पुढील पंधरवडा जोखमीचा
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
अतिशय तुटपुंज्या साधन सुविधांच्या सहाय्याने आरोग्य यंत्रणेकडून सुरू असलेली झुंज, त्यास महसूल, पोलीस व जि. प. प्रशासनाकडून मिळालेली साथ, जिल्हय़ातील नागरिकांनी चांगल्या प्रकारे पाळलेले लॉकडाऊन आणि बाहेरून आलेल्या क्वारंटाईन नागरिकांवर गाववाल्यांनी ठेवलेले नियंत्रण यामुळे जिल्हा प्रशासनाच्या नावाने कोणी कितीही शिमगा करो. मात्र मागील 60 दिवसांत कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात सिंधुदुर्गने बऱयापैकी यश मिळवलंय, हे मान्य करावच लागेल. पुढील दिवसांत काय होईल, हे कोणीच सांगू शकणार नाही. पण आतापर्यंतचे यश हे मेहनतीचे फळ होते, हे लक्षात घ्यावे लागेल.
आतापर्यंत सिंधुदुर्गात परजिल्हय़ातून अधिकृत आणि अनधिकृत पकडून तीस हजाराहून अधिक नागरिक दाखल झाले आहेत. त्यात हॉटस्पॉट असलेल्या मुंबई-पुण्यातील 70 टक्के चाकरमान्यांचा सहभाग आहे. आपल्याप्रमाणेच लगतच्या रत्नागिरी आणि गोव्यातही परजिल्हय़ातून व विशेषत: मुंबईतून मोठय़ा प्रमाणावर नागरिक दाखल झाले आहेत. पण तेथील परिस्थिती आणि आपल्या सिंधुदुर्गातील परिस्थिती यात बराच फरक आहे. या सगळय़ा जिल्हय़ांमध्ये एकाचवेळी परजिल्हय़ातील व विशेषत: मुंबईतील चाकरमान्यांचा प्रवेश सुरू झाला. परंतु, रत्नागिरीतील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा शंभरीच्या पार पोहोचला, तर गोव्यातील आकडा पन्नाशीपर्यंत पोहोचला. सिंधुदुर्गात मात्र मागील 60 दिवसात आठ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यातील चार कोरोनामुक्त होऊन घरीही परतले आहेत. तर चौघांची प्रकृती झपाटय़ाने सुधारत आहे.
पुढील 15 दिवस खूप जोखमीचे
अलिकडच्या आठवडाभरात मुंबई-पुण्यासारख्या रेडझोनमधून येणाऱया चाकरमान्यांची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. आठवडाभरात जवळपास 34 हजार नागरिक या जिल्हय़ात दाखल झाले आहेत. अजूनही येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण प्रचंड वाढला आहे. संस्थात्मक अलगीकरणासाठी आता जागा अपुऱया पडू लागल्यामुळे कंटेनमेंट एरिया वगळता अन्य कोणत्याही झोनमधून आलेल्या नागरिकांना गृह अलगीकरणात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या जिल्हय़ाची ही अपरिहार्यता आहे. त्यामुळे धोका कित्येकपटींनी वाढला आहे. मुंबईतील सेंट जॉर्ज या एकाच शासकीय कोव्हीड रुग्णालयात जवळपास 42 व्हेंटीलेटर आहेत. तर आपल्या पूर्ण जिल्हय़ात मिळून एकूण फक्त 10 ते 12 व्हेंटीलेटर आहेत. एवढय़ा तुटपुंज्या आरोग्य सामुग्रीवर आपणास मोठी लढाई लढायची आहे.
जिल्हा रुग्णालयावर आरोप, तरीही कौतुकास्पद काम
या कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्य विभागाने आतापर्यंत चांगले काम केले असले, तरी अनेक आरोपांना व टिकेला त्यांना सामोरं जावं लागलं आहे. जिल्हा रुग्णालयातील कोविड-19 च्या व्यवस्थापनावर व नियोजनावर वारंवार टीका होत आहे. कोविड वॉर्डमधील कर्मचाऱयांना इतर कामासाठी संपूर्ण इस्पितळात फिरवले जाते. आयसोलेशनमधील रुग्ण वॉर्डच्या बाहेर फिरतात. टेस्ट रिपोर्ट येण्यापूर्वीच संशयित रुग्णांना सोडले जाते, असे अनेक आरोप या रुग्णालय प्रशासनावर झाले. यात काही प्रमाणात वस्तुस्थितीही आहे. पण तरीही कोविड रुग्णांसाठी हे रुग्णालय फारशा सुविधा नसतानाही घेत असलेली मेहनत व मिळालेले यश कौतुकास्पद आहे. या रुग्णालयाने त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांमध्ये तथ्यता असेल, तर त्यात त्यांनी सुधारणा करायला हव्यात.
जिल्हा प्रशासनाची कामगिरी उल्लेखनीय
60 दिवसांतील यशाचे श्रेय आरोग्य यंत्रणेबरोबरच महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनालाही द्यावं लागेल. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची कामगिरी कौतुकास्पद आहे तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांचीही कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी हा जिल्हा सुरक्षित ठेवण्यासाठी घेतलेली मेहनत थक्क करणारी आहे. सर्वांना सोबत घेत व आपल्या महसूल यंत्रणेची पुरेपूर ताकद लावून त्यांनी खरोखरच उत्तम कामगिरी बजावली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी पोलीस यंत्रणा प्रभावीपणे वापरली. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांनी देखील आपली आरोग्य यंत्रणा, शिक्षण यंत्रणा, ग्रामपंचायत यंत्रणा प्रभाविपणे राबवली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे या सर्वांनी एकसंध रितीने काम केल्याने मागील 60 दिवसात या जिल्हय़ाने कोरोना रोखण्यात यश मिळविले.
विविध सामाजिक संस्थांचाही यशात वाटा
या यशात आणखी दोघांचा वाटा आहे तो म्हणजे जिल्हास्तरावर अतिशय उत्तम पद्धतीने काम करणाऱया सेवाभावी संस्था. भगिरथ प्रतिष्ठान, अटल प्रतिष्ठान, लुपिन फाऊंडेशन, आर. एस. एस. रोटरी क्लब, अनेक धार्मिक संस्था, बँका, न्यायालय, शिक्षक संघटना अशा अनेक संघटना मदत कार्यात उतरल्या होत्या. सर्व राजकीय पक्षांनी देखील सुरुवातीच्या काळात मदत कार्यात सिंहाचा वाटा उचलला. या सर्वांचा देखील या यशात वाटा आहे. पुढील काळात या पेक्षाही अधिक धोका आहे. पुढील पंधरा दिवस फार महत्वाचे ठरणार आहेत.









