ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
युवा कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला ऑलिंपिकपदक विजेता सुशील कुमार याला पुन्हा एकदा झटका बसला आहे. सागर धनखड या कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी सुशीलच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने सहा दिवसांची कोठडी दिली होती. त्याची मुदत आज शनिवारी संपली होती. आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
पोलिसांनी आज न्यायालयाकडे सुशीलची आणखी सात दिवस कोठडी मागितली होती. न्यायालयाने देखील न्याय मिळण्याच्या दृष्टीने पोलिसांची विनंती मान्य केली. पण सात ऐवजी चार दिवसांची कोठडी दिली आहे. दिल्लीतील छत्रसाल स्टेडियम येथे 4 आणि 5 मेच्या रात्री सागर धनखड या युवा कुस्तीपटूला सुशील आणि त्याच्या सहकाऱ्यांनी गंभीर मारहाण केली होती. त्यानंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला होता.
सागरच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुशीलचा शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर तो फरार झाला होता. त्यानंतर सुशील कुमार आणि त्याचा साथीदार अजय यांना 20 दिवसानंतर अटक करण्यात आली आहे. आपल्या साथीदाराबरोबर एकाला भेटायला स्कूटीवर जात असताना सकाळी सुशील कुमार व त्याचा साथीदार अजय याला दिल्ली पोलिसांनी मुंडका मेट्रो स्टेशनवरून अटक केली.
दरम्यान, सुशील कुमारने दोन वेळा ऑलंपिक पदकं जिंकण्याचा विक्रम केला आहे. त्याच्या या विक्रमाचा सन्मान म्हणून उत्तर रेल्वेने त्याला ऑफिसन ऑन स्पेशल ड्यूटी हे पद दिले होते. मात्र, त्याच्यावर हत्येचा आरोप असून हत्येच्या गुन्ह्याचा तपास सुरु असल्याने रेल्वेने आता त्याला नोकरीवरुन निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.